नवी दिल्ली | New Delhi
नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रविवारी (दि.०९) रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर काल (सोमवारी) एनडीएतील (NDA) मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. या खातेवाटपात भाजपने महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवल्याचे दिसून आले. तर मित्रपक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आले. यानंतर आता मोदींसह एनडीएच्या मंत्रिमंडळाला १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची (Loksabha Speakership) निवड करावी लागणार आहे. हे पद दक्षिणेतील नेत्याला दिले जाण्याची शक्यता असून त्यातून लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत मिळालेला जनाधार आणखी मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे.
त्यामुळे आता लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या (BJP) आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी (D. Purandeswari) यांच्या नावाचा विचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. डी. पुरंदेश्वरी यांचे नाव केंद्रात मंत्रिपदासाठी चर्चेत होते. पंरतु, त्या लोकसभा अध्यक्षपदासाठी संभाव्य दावेदार असल्याने त्यांना मंत्रिपदाची संधी न दिल्याचे बोलले जात आहे. पुरंदेश्वरी या दिवंगत एन. टी. रामाराव यांच्या कन्या आहेत. तर त्यांची बहीण आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची पत्नी आहे. चंद्राबाबू नायडू आणि भाजपला एकत्र आणण्यात पुरंदेश्वरी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, डी. पुरंदेश्वरी या दोन वेळा काँग्रेसच्या (Congress) खासदार (MP) राहिल्या आहे. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसकडून २००९ मध्ये त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर २०१२ मध्येही त्या वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. पुरंदेश्वरी या चंद्राबाबू नायडूंच्या विरोधक म्हणून ओळखल्या जात होत्या. पंरतु,आता एनडीएत चंद्राबाबूंना आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.