लोणी |वार्ताहर| Loni
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील कामगार तलाठी कार्यालयाला शनिवारी पहाटे अचानक आग लागल्याने कार्यालयातील कागदपत्रांसह फर्निचर आणि इतर वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दाढ बुद्रुकच्या ग्राम महसूल अधिकारी पुनम संजय वैष्णव यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत म्हटले आहे, शनिवार 3 जानेवारी रोजी सकाळी दाढ बुद्रुक येथील तलाठी कार्यालयाला अचानक आग लागून कार्यालयातील कागदपत्रे व वस्तूंचे जळून नुकसान झाले.
त्यात 42 हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, 7 हजार रुपये किमतीचा कॅनॉन कंपनीचा प्रिंटर, 2 हजार रुपये किमतीचे लोखंडी कपाट, 2 हजार रुपये किमतीच्या पाच खुर्च्या, दीड हजार रुपये किमतीचे तीन टेबल, 35 हजार किमतीचे गाव नकाशा फ्रेम, जळीत झालेल्या कपाटातील कार्यालयीन कागदपत्रे, रेकॉर्ड ऑफ राईट फाईल, फेरफार नोंदीचे मूळ कागदपत्रे, फेर नं. 10,000 ते 12,785 पर्यंतचे सर्व कागदपत्र, गाव नमुना नं. 1 ते 20 सन 1995 ते 2023 पर्यंतचे सर्व, वरिष्ठ कार्यालयात केलेल्या पत्रव्यवहाराच्या स्थळप्रत फाईल, वाजीब उल अर्ज, निस्तार पत्र फाईल, इलेक्ट्रिक बोर्ड, फॅन ट्युब आदींसह सुमारे 89 हजार 500 रुपयांचे जळीतामध्ये नुकसान झाले आहे.
लोणी पोलिसांनी अकस्मात जळीत रजिस्टर नं. 1/2026 प्रमाणे नोंद केली असून सपोनि कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष चौधरी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. कार्यालयाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की कुणी अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य केले याचा शोध घेतला जात आहे. महावितरणच्या अधिकार्यांना माहिती देण्यात आली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की नाही याचा अहवाल त्यांच्याकडून मिळणार आहे.




