Sunday, September 15, 2024
Homeनाशिकदहेगाव धरण 11 वर्षांनंतर तुडुंब

दहेगाव धरण 11 वर्षांनंतर तुडुंब

नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

- Advertisement -

संततधार पावसामुळे नांदगाव शहरास पाणीपुरवठा करणारे दहेगाव धरण तब्बल 11 वर्षानंतर शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांडवा प्रवाहीत झाल्याने धरणाखालील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शेतकर्‍यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

नांदगाव शहरापासून दहेगाव शिवारात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले दहेगांव धरण 11 वर्षांनंतर 100 टक्के भरल्याने तालुक्याचे आ. सुहास कांदे यांच्या हस्ते दहेगांव धरणाचे विधिवत पुजन करून जलपूजन करण्यात आले.

यापुर्वी 2009 मध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने दहेगाव शंभर टक्के भरले होते. 11 वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर यंदा धरण भरल्यामुळे यंदा पाणीटंचाईची तीव्रता फारशी जाणवणार नसल्याने शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दहेगाव धरण शंभर टक्के भरताच आ. सुहांस कांदे यांनी धरणास भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष राजेश कवडे, उपनगराध्यक्ष अभिषेक सोनवणे, नगरसेवक नंदु पाटील, पो.नि. संतोष मटकुळे, मुख्याधिकारी पंंकज गोसावी, आनंद महिरे, तालुकाप्रमुख किरण देवरे आदी उपस्थित होते.

73.5 द.ल.घ.फुट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या दहेगाव धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. धरणाची उंची 20 मीटर आहे. नगरपरिषदेच्या मालकीचे हे धरण असून या धरणाचे संपुर्ण पाणी पिण्यासाठी नांदगाव शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. नांदगाव शहरास धरण भरल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच दहेगांव व परिसरातील गावांमध्ये सिचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आल्याने समाधानाचे वातावरण पसरले. दरम्यान या धरणाचा नांदगाव शहराला दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

जलशुध्दीकरण केंद्र निर्मितीची मागणी

दहेगाव धरण शंभर टक्के भरल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असली तरी शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र नगरपरिषदेने त्वरीत कार्यान्वित करावे, अशी मागणी नागरीकांतर्फे केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरात जलवाहिन्या बदलण्यात आलेल्या नाही. त्यामुळे अनेक वेळा दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येते. जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित झाल्यास सुरळीत पाणीपुरवठा होवू शकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या