Wednesday, July 3, 2024
Homeसंपादकीयहम चलेंगे साथ साथ..लेके हाथो मे हाथ

हम चलेंगे साथ साथ..लेके हाथो मे हाथ

बार्बाडोसच्या मैदानावरचा तो दिवस संघभावनेचा होता. आव्हानांवर मात करण्याचा होता. समाजमाध्यमांवरील टीकेला तडाखेबंद उत्तराचा होता. ‘हम चलेंगे साथ साथ..लेके हाथो में हाथ’ म्हणजे नेमके काय याचा प्रत्यय देशाने घेतला. संघातील सगळेच खेळाडू अनुभवी आणि संधी मिळेल तेव्हा विक्रमांचा डोंगर रचणारे. पण सगळेच फक्त जिंकायचे याच ईर्षेने पेटून उठले होते. त्यांचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते आणि ते साध्य करण्यासाठी सगळे झटले. त्याच्या परिणितीचा अवघा देश साक्ष आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने कधी ना कधी वैयक्तिक आणि खेळातील कामगिरीबाबत चढउतार सहन केले.

- Advertisement -

समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगचा सामना केला. त्यातून निराशा दाटून आली असती तरी ते चुकीचे मानले गेले नसते. गेले अनेक महिने हार्दिक पंड्या ट्रोलिंग सहन करतोय. इतके की तो मैदानावर खेळत असतांनाही लोक त्याची खिल्ली उडवत राहिले. कोहलीचा फॉर्म संपला असे त्याला हिणवले गेले. ज्याच्या झेलाने सामना फिरला असे अभिमानाने सांगितले जात आहे त्या सूर्यकुमार यादवला फॉर्म नाही म्हणून गतवर्षी संघात स्टॅण्डबाय ठेवले गेले होते. कप्तान रोहित शर्माच्या खेळाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या. एकेकाळी त्याला विश्वचषकाच्या संघातून डावलले गेले होते.

अंतिम सामन्यापूर्वीच्या रात्री एकही सेकंद झोपलेलो नाही असे त्याने माध्यमांना सांगितले. अशा अनेक मुद्यांसह विश्वचषक जिंकण्याचा दबाव संघातील प्रत्येकावर होताच. पण त्याचा सामना कसा करायचा आणि ध्येयपूर्ती कशी करायची हेच याचाच सामूहिक प्रत्यय प्रेक्षकांना आला. त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. विश्वचषकावर पुन्हा एकदा भारताचे नाव कोरले गेले आहे. हे यश साजरे कारण्याच्या नादात महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी नुकत्याच रचलेल्या आणि तोही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळताना केलेल्या विक्रमाकडे सर्वांचेच अंमळ दुर्लक्ष झाले असावे का?

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघांमध्ये कसोटी सामने सुरु आहेत. भारतीय संघाने महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी तो विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. महिला क्रिकेट अजूनही लोकप्रियतेच्या आणि पुरुष संघांइतकीच दखल घेण्याच्या प्रतीक्षेत आहे असा याचा अर्थ काढला जाऊ शकेल का? महिला खेळाडूंवर देखील नकळत होत असलेल्या उपेक्षेचा दबाव नेहमीच असतो. पण हे सगळे खेळाडू सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेला पुरून उरत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्याही आयुष्यातील संकटांचा सामना करावा हीच खेळाडूंची अपेक्षा असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या