2050 पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या सुमारे 35 कोटींपर्यंत जाईल असा जागतिक अंदाज आहे. जसे जसे वय वाढत जाते तसतशा मानसिक आणि शारीरिक समस्या वाढत जातांना आढळतात. तथापि अनेक ज्येष्ठांसाठी त्यांचे वय म्हणजे फक्त आकडा असतो. जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले 91 वर्षांच्या आहेत. तथापि नुकत्याच झालेल्या एका मैफिलीत त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेले एक गाणे तर म्हंटलेच पण ठेकाही धरला.
फौजा सिंग 113 वर्षांचे आहेत. त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी मॅरेथॉन धावायला सुरुवात केली. वयाच्या शंभराव्या वर्षी ते पूर्ण मॅरेथॉन धावले. असे करणारी सर्वात वयस्कर व्यक्ती असा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. झियिंग चेंग या वयाच्या 58 व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये खेळल्या. चोई सून ह्या या आजी वयाच्या 81 व्या वर्षी मिस युनिव्हर्स मध्ये स्पर्धक होत्या. त्याच वयाच्या मार्गारेट चोला जागतिक फॅशन आयकॉन आहेत. शोध घेतला तर अशी कितीतरी नावे सापडू शकतील ज्यांच्यासाठी त्यांचे वय फक्त आकडा आहे. वयाची शंभरी पार करणार्यांचा जागतिक आकडा वाढत आहे.
2024 मध्ये असे सुमारे सहा लाख लोक होते आणि 2030 पर्यंत हा आकडा दहा लाख असू शकेल असा संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागाने असा अंदाज माध्यमांकडे व्यक्त केला आहे. वय वाढते तशा समस्या देखील वाढतात. ज्येष्ठांच्या आरोग्याचे प्रश्नही गंभीर होतात. त्यामुळे ते आणि त्यांचे कुटूंबीय ताणात आढळतात. तथापि त्यांनी ठरवले तर ते त्यांचे आयुष्य आनंदात घालवू शकतात याचीच ही काही उदाहरणे म्हणावी लागतील. आनंद पैशात विकत मिळत नाही असे म्हंटले जाते. तो मानण्यावर अवलंबून असतो. परिस्थितीचा स्वीकार केला की गोष्टी सोप्या होऊ शकतात. याच मानसिकतेच्या बळावर अनेक व्यक्ती जीवघेण्या आजारावर मात करतात.
पण अनेकदा वाढत्या वयाची माणसे मनाने देखील वयस्कर होतात. अनेक मर्यादा स्वतःवर लादून घेतात. भूतकाळाचे ओझे बाळगतात. समाज काय म्हणेल याचाच जास्त विचार करतात. पण ते योग्य म्हंटले जाऊ शकेल का? अशाना संदीप खरे त्यांच्या गाण्यातील एक मार्ग दाखवतात. ते म्हणतात, मी हजार चिंतांनीही डोके खाजवतो.. तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो. याचा अर्थ त्याला चिंता नसतात असे नव्हे. त्या चिंतांचा बाऊ न करता त्यावर सकारात्मक मात करण्याचा प्रयत्न करतात. मजेत जगण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ज्यांचे वय फक्त आकडा असते अशी माणसे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात.