Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ५ डिसेंबर २०२४ - तुझे आहे तुजपाशी…

संपादकीय : ५ डिसेंबर २०२४ – तुझे आहे तुजपाशी…

माणसांनी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवे, या विषयावर अमेरिकेच्या हावर्ड विद्यापीठात गेली 87 वर्षे संशोधन सुरु असल्याचे सांगितले जाते. त्याचे काही निष्कर्ष माध्यमात नुकतेच प्रसिद्ध झाले. नाती टिकवणे आणि जपणे, एकटेपणाचा त्याग करणे आणि सामाजिकता जपणे हे त्यापैकीच काही.

अधूनमधून जगातील सर्वाधिक आनंदी देशांची यादी प्रसिद्ध होत असते. भारताचा क्रमांक त्या यादीत शंभराच्याही वरती आढळतो. आनंदाच्या बाबतीत, ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ अशी भारतीयांची अवस्था होत असावी का? संतांनी आनंद कशात मिळतो हे स्पष्ट करणारे अभंग लिहिले. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे म्हटले. ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ अशा अनेक कविता कवींनी लिहिल्या. सामाजिकता, कुटुंबसंस्था, नात्यांचा गोतावळा, सामाजिक ऋणानुबंध ही मूल्ये मुळात भारतीय संस्कृतीची अंगभूत वैशिष्टये. तो वारसा पिढी दर पिढी पुढे चालत येतो असे मानले जाते तरीही आनंदी राहणे माणसे का विसरत चालली असावीत? ‘आरोग्यम् धनसंपदा’ याचा माणसांना विसर पडला आहे.

- Advertisement -

एकटेपणा हा आनंदाला सर्वाधिक मारक ठरतो असेही त्या वृत्तात म्हटले आहे. माणूस हा समाजशील मानला जातो. सगळे सणवार देखील त्याभोवतीच गुंफलेले आढळतात. तरीही माणसे एकटी होत चालली आहेत असे तज्ज्ञांचे निरीक्षण आढळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांनी जग जवळ आणले खरे पण माणसे एकमेकांपासून लांब गेली असे सरसकट म्हटले जाते. तथापि त्या साधनांच्या आहारी जाऊन बहुसंख्य माणसांनी एकटेपणा निवडला असावा. त्याचा नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. माणसे एकमेकांना वेळ देईनाशी होतात.

एकमेकांमध्ये मिसळेनाशी होतात. मन शांती गमावतात. नात्यांची वीण विसविशीत होते आणि ‘मन करा रे प्रसन्न’ याचाच विसर पडतो. माणसांचा आनंद भौतिक सुखांभोवती फिरतो. पण ठरवले तर खरा आनंद माणसे प्राप्त करू शकतात. त्याची काही सूत्रे उपरोक्त निष्कर्षात आहेत. आनंदाचे गाणे गाण्यासाठी मनात जागा करणे आवश्यक आहे. ती कशी होऊ शकेल? मनात कचरा, नकारात्मक भावना, उणेदुणे भरण्याची सवय हळुहळू बदलावी लागेल. त्या अर्थाने मन रिकामे करायला हवे. एकदा का ती कला माणसांना साधली तर मग आनंद बाहेर शोधायची गरजच कदाचित उरणार नाही आणि आनंदी राहण्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज उरणार नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...