जगभरात ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस’ नुकताच साजरा झाला. एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांचा वापर थांबवणे हा त्यामागचा उद्देश आहे. आजकाल अवघे मानवी जीवन प्लास्टिकने व्यापले आहे. खरे तर प्लास्टिक वस्तूवापराबाबत पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे, पण निदान एकदा वापरून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबायला हवा. कारण टिकाऊपणा हाच त्यांचा सर्वात मोठा दुर्गुण बनला आहे. असे प्लास्टिक नष्ट होत नाही आणि वापरल्या गेलेल्या सगळ्याच पिशव्यांचे पुनर्चक्रीकरण (रिसायकल) केले जात नाही. त्यामुळे विविध प्रकारचे प्रदूषण होते. त्यांच्या वापरावर वेळोवेळी बंदी घातली जाते आणि लोक त्या बंदीचा आपल्या परीने फज्जा उडवतात.
प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध करून दिले तर त्यावरील बंदी प्रभावी ठरण्याची शक्यता वाढेल. प्लास्टिक पिशव्या वापराला पर्याय देण्यासाठी सामान्य माणसेदेखील पुढाकार घेताना दिसत आहेत. आपापल्या पातळीवर पर्यावरणविषयक जागृती निर्माण करीत आहेत. नाशिकच्या विमल वसमतकर त्यापैकीच एक! त्या स्वतः कापडी पिशव्या तयार करतात आणि कोणत्याही निमित्ताने लोकांना वाटतात. हळदीकुंकू असो अथवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम; घरगुती टाकाऊ कपड्यापासून त्या पिशव्या शिवून घेतात. गेल्या दशकभरात १५ हजारांहून जास्त पिशव्यांचे वाटप केल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. कापडी पिशव्यांचा वापर प्रतिष्ठेचा (स्टाईल स्टेटमेंट) बनायला हवा. कापडी पिशवी वापरणारी व्यक्ती पर्यावरणाची, पर्यायाने वसुंधरेची हितचिंतक आहे, असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करायला हवे. तसे झाले तर तरुणाई त्याकडे नक्की आकर्षित होईल.
कापडी पिशव्यांचा वापर करायला मोठ्या प्रमाणात प्रवृत्त होईल. मंगळुरु येथील एक युवा उद्योजक नैसर्गिक स्टार्चपासून सेंद्रिय पिशव्या उत्पादित करतात. केवळ एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्याच नव्हे तर एकूणच प्लास्टिक वस्तूंचा वापर कमी व्हावा यासाठी समाजात अनेक प्रयोग केले जात आहेत. दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राच्या पर्यावरण गतिविधी विभागाने नाशिक शहरासह जिल्हा आणि राज्यात अनेक ठिकाणी ‘स्टील ताटांची बँक’ सुरु केली आहे. पंचवीस ते पाचशे माणसांच्या जेवणावळीसाठी या बँकेतून ताट, वाटी, पेला आणि चमचा मोफत उपलब्ध करून दिला जातो.
थर्माकोलयुक्त ताटे आणि पेल्यांचा वापर थांबवणे हा त्यामागचा उद्देश आहे. अशा प्रयोगांचे अनुकरण सामान्य माणसांना शक्य वाटते, हे अशा प्रयोगांचे वैशिष्ट्य आहे. प्लास्टिक पिशवीला ‘नाही’ म्हणण्याची त्यांची एक छोटी कृती प्रभावी परिणाम साधू शकेल. कारण कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाचे परिणाम सामान्य माणसांना जास्त सोसावे लागतात. तात्पर्य, अशा प्रयोगांना अनुकूल प्रतिसाद देऊन ते सार्थ ठरवणे ही सामान्य माणसांचीदेखील जबाबदारी आहे.





