गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष राज्याच्या आरोग्य विभागाने नोंदल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार हे काही सामान्य जलजन्य आजार मानले जातात. ज्यांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो.
गेल्यावर्षी सुमारे 19 वेळा साथ आली आणि गेली. यंदा अजून पावसाळा सुरू आहे, पण साथ येण्याची आणि जाण्याची संख्या आताच सुमारे 53 झाल्याचे त्या वृत्तात म्हटले आहे. तसेही पावसाळ्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता अन्य ऋतूंच्या तुलनेत जास्त असते. या काळात विविध प्रकारचे आजार संभवतात. जसे की, पोटाचे, त्वचेचे, विषाणू व कीटकजन्य. त्यातच जलजन्य आजरांचा समावेश आहे.
या आजारांचा प्रादुर्भाव टाळणे काही प्रमाणात माणसांच्या हातात आहे. त्यासाठी हे आजार का पसरतात ते समजून घेतले जायला हवे. ती माहिती करून घेतली म्हणजे संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घेणे गरजेचे असते, हेही माणसांच्या लक्षात येऊ शकेल. अशी माहिती देण्यात माध्यमेही अग्रेसर आढळतात. पावसाळ्यात पाणी दूषित होते. तेच पाणी माणसांच्या पिण्यात येऊ शकते. पाण्यापासून जलजन्य आजार संभवतात.
याच काळात घरात आणि परिसरात स्वच्छता राखली गेली नाही तर डासांचा उपद्रव वाढतो. त्यापासून विषाणूजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. असाच तर्क अन्य आजारांच्या बाबतीतही लावला जाऊ शकेल. दैनंदिन जगण्यात माणसांनी थोडीशी दक्षता बाळगली तर साथी आटोक्यात ठेवण्यास मदत होऊ शकेल. अशा छोट्या मोठ्या आजारांना अटकाव करण्यात प्रतिकारक्षमताही मोलाची भूमिका बजावते. ज्यांची ती क्षमता कमजोर असते त्यांना इतरांच्या तुलनेत कोणताही संसर्ग लवकर बाधू शकेल.
प्रतिकारक्षमता विकसित होण्याचे आहार-विहार-किमान व्यायाम-प्राणायाम आणि पुरेशी झोप हे आधारस्तंभ मानले जातात. या पातळीवर बहुसंख्य माणसांची दिनचर्या विपरीत आढळते. आरोग्यतज्ज्ञही त्याकडे नेहमीच लक्ष वेधून घेतात. बाहेरचे आणि जंकफूड खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आढळते. शांत झोप लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. व्यायाम आणि प्राणायामाला वेळच मिळत नाही ही सबब पुढे केली जाते.
ही परिस्थिती केवळ जलजन्यच नव्हे तर कोणत्याही आजारांच्या संसर्गासाठी पोषकच नाही का? तेव्हा ऋतुजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी त्या-त्या ऋतूत आवश्यक असलेली काळजी तर माणसांनी घ्यायला हवीच पण प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी त्यापेक्षा काकणभर अधिकच परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर किमान आरोग्य राखण्याची गुरुकिल्ली माणसाला गवसेल हे नक्की.