Tuesday, September 17, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ७ ऑगस्ट २०२४ - समाजाला उत्तम मनुष्यत्वाची आवश्यकता

संपादकीय : ७ ऑगस्ट २०२४ – समाजाला उत्तम मनुष्यत्वाची आवश्यकता

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. चांगला माणूस होण्यासाठी दुसरा पर्याय नाही. अवचित प्रसंगी मित्र-मैत्रिणी खचून जाऊ शकतात. तेव्हा त्यांना साथ द्या. कठीण प्रसंगात एकमेकांची साथ सोडू नका. समाजात वावरताना कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवा. त्यासाठी समाजभान जागृत ठेवण्याचा सल्ला प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन याने दिला आहे. माणसाने उत्तम माणूसच व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे. राघवन यांनी दिलेल्या सल्ल्याचे समाज स्वागत करेल.

- Advertisement -

संवेदना, सामाजिक बांधिलकी, सहवेदना, साहचर्य, मदतीची भावना ही माणसाची काही वैशिष्ट्ये. तथापि त्यांची वीण विसविशीत होत चालल्याचे अनुभव समाज घेतो. अलीकडच्या काळात अशा घटनांनमध्ये वाढ होत चालल्याचे आढळते. समाजात घडणार्‍या अनेक अनावस्था आणि कटू प्रसंगांमध्ये अनेक लोक ‘बघ्याची’ भूमिका घेताना आढळतात. अपघात घडतात. त्यातील जखमी मदतीच्या प्रतीक्षेत असतात. रस्त्यावर मारामार्‍या होतात. मुलींची छेड काढली जाते. प्रेमप्रकरणातून त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडतात. अशा प्रसंगांमध्ये क्वचितच माणसे मदतीला धाव घेताना आढळतात. त्याऐवजी प्रसंगाचे मोबाईलवर चित्रिकरण करण्यात मात्र आघाडीवर दिसतात.

सामान्य माणसे मदतीला धाव का घेत नसावेत? त्याचीही काही कारणे असू शकतील का? प्रसंग अपघाताचा असला तर न्यायालयाच्या किंवा पोलीस स्थानकांच्या चकरा माराव्या लागतील, मारामार्‍या सोडवायला गेले किंवा छेड काढणार्‍यांना हटकले तर मध्यस्थी करणार्‍यालाच मारहाण होऊ शकेल, अशी भीती सामान्य माणसांना वाटते. तशा घटना घडल्याही आहेत. पण विरोध करायला एक जरी व्यक्ती पुढे आली तर त्याची साथ द्यायला पुढे येण्याची हिंमत माणसांमध्ये येऊ शकते, हे काही प्रसंगांनी अधोरेखित केले आहे.

सामाजिक मदतीच्या गरजेची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येते. अशावेळी आजूबाजूच्या माणसांनी मदतीसाठी धाव घ्यावी, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. तथापि मदतीची सुरुवात स्वतःपासून करणे आवश्यक आहे याचा मात्र माणसांना विसर पडला असावा का? मला काय त्याचे अशी किंवा मदतीसंदर्भात भीतीचीच भावना प्रत्येकाच्या मनात असली तर मदतीसाठी कोण धावेल याचाही विचार केला जाऊ शकेल का? अन्यथा मदतीला कोणीच पुढे येत नाही असा दोषारोप होतच राहील.

सामाजिक वेदना जाणवण्यासाठी प्रत्येकाने चांगला माणूस होणे गरजेचे आहे हेच सुमित राघवन यांना सुचवायचे असावे. ज्याची समाजाला कधी नव्हे इतकी गरज आहे. सामाजिक वातावरण कलुषित होत आहे. भेदाभेद समाजाला विघटनाच्या उंबरठ्यावर उभे करण्याचा धोका आहे. तसे होणे अंतिमतः समाजच्या हिताचे नाही. तेच राघवन यांना सुचवायचे असावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या