Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १ ऑगस्ट २०२४ - या लोकांसी वेड लागले

संपादकीय : १ ऑगस्ट २०२४ – या लोकांसी वेड लागले

एका भारुडात संत एकनाथ महाराज, ‘या लोकांसी..या जनांसी वेड लागले..’ ते कसे याचे करतात. ते आजही अनेक परिस्थितीत चपखल उदाहरण ठरते. तसे नसते तर पुराच्या वेगाने वाहणार्‍या पावसात माणसांनी गाड्या घातल्या असत्या का? बंदी उठवताक्षणी अनेक पावसाळी पर्यटनस्थळी प्रचंड गर्दी केली असती का? अनेक ठिकाणचा पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुराचा धोका कमी झालेला नाही.

पाऊस कोणत्याही क्षणी कधी वाढेल आणि पूर कधी येईन हे कोणीच सांगू शकणार नाही. पुराच्या पाण्यात गाडी घालून त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालण्याच्या घटना घडतात. त्यांचे प्रमाण वाढत आहे. पुराच्या पाण्यात बस घातली म्हणून बसच्या चालकाला निलंबित करण्यात आले. तथापि इतर अनेक घटनांमध्ये मात्र लोकांचे प्राण गेल्याचे आढळते. घटना घडतात त्या-त्यावेळी त्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध होते.

- Advertisement -

जीवावर बेतणारा अति किंवा फाजील आत्मविश्वास कामाचा नसतो, हेही माणसांना कळू नये का? पावसाचा भरवसा राहिलेला नाही. थोड्या काळात अतिपाऊस पडतो हे खरे. पाऊस कसा आणि किती पडावा हे माणसांच्या हातात नाही पण मुसळधार पाऊस पडत असताना किंवा पूर आलेला असताना कसे वागावे हे तर माणसांच्याच हातात असते. स्थानिक नदीचा परिसर स्थानिक माणसांच्या परिचयाचा असतो.

नदीवरील सांडवे लोक रोजच ओलांडत असतात हे खरे. पण त्यावरून वाहणार्‍या पुराच्या पाण्याचा वेग आणि त्यामुळे वाढलेली नदीपात्राची खोली किती लोक सांगू शकतील? मग केवळ तो भाग परिचयाचा आहे याचा आधार घेऊन त्या परिसरात पुरात गाडी घालण्याचे, वेगाने पाणी वाहत असताना पायी चालत सांडवे ओलांडण्याचे किंवा पोहोण्याचे कोणत्याही दृष्टिकोनातून समर्थन होऊ शकत नाही.

तरीही असे अनाठायी धाडस माणसे करतात आणि प्रसंगी जीव गमावून बसतात. अशा दुर्दैवी घटनांमध्ये जीव फक्त त्याच व्यक्तीचा जातो का? कुटुंबातील युवांकडून कुटुंबाच्या अनंत अपेक्षा असतात. तथापि त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंब उद्ध्वस्त होते. तेव्हा केवळ पूरच नव्हे तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत जीव धोक्यात न घालण्यातच शहाणपण आहे याची खूणगाठ मारलेलीच बरी.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या