क्रिकेट क्षेत्रातील द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचा कार्यक्रम अजूनही चर्चेत आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. तथापि क्रिकेटमधील दंतकथा मानल्या जाणार्या सचिन तेंडुलकरच्या तंदुरुस्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यावरदेखील चर्चा होणे अपेक्षित होते. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सचिनचा त्या कार्यक्रमातील वावर अत्यंत सहज आणि उत्साहपूर्ण होता.
सचिनला आजही अनेक जण, विशेषतः तरुणाई आदर्श मानते. एकूणच, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सचिनकडून घेतली जाणारी मेहनत समाजासाठी प्रेरणादायी ठरावी. जिम, एखादा खेळ, स्ट्रेचिंग, वेट ट्रेनिंग, योग आणि अशाच काही गोष्टींचा त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकात समावेश आहे. गेल्या वर्षी त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली. तेव्हासुद्धा त्यांच्या याच वेळापत्रकाची चर्चा झाली होती. ज्येष्ठ अभिनेते बच्चन यांचेही उदाहरण सर्वांसमोर आहे.
बच्चन मुंबईत असतात तेव्हा ते कितीही व्यस्त असले तरी सकाळी सहा वाजता जिममध्ये हजर असतात, असे त्यांच्या प्रशिक्षकाने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याचीच जास्त उणीव सध्या जाणवते. विविध आरोग्य सर्वेक्षणांचे निष्कर्षसुद्धा त्याकडेच अंगुलीनिर्देश करतात. पूर्वी ज्येष्ठांना त्यांच्या उतारवयात व्याधी गाठायच्या. आता ते वय अगदी अलीकडे म्हणजे वयाच्या विशीकडे सरकले आहे. अनुवंशिकता हे काही व्याधींच्या संसर्गाचे कारण सांगितले जाते, पण ते सरसकट सर्वांना लागू होईल का?
व्यायामाचा, शारीरिक खेळांचा आणि कवायतीचा अभाव हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यासाठी वेळ नसतो, असे एक पालुपद नेहमीच पुढे केले जाते, पण एखादी व्याधी जडल्यानंतर तेच लोक व्यायामासाठी वेळ काढतात. मैदान जवळ करतात. तोच वेळ आधी काढला तर अनेक व्याधी टाळल्या जाऊ शकतील किंवा त्यांचा संसर्ग पुढे तरी ढकलला जाऊ शकेल. तथापि त्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीच्या आवश्यकतेची जाणीव होणे आवश्यक आहे. ती जाणीव करून देणारी अनेक उदाहरणे अवतीभोवती आढळतात.
अकाली गाठणार्या व्याधी त्याची आठवण करून देतात. एकदा त्याची जाणीव झाली की वेळ नाही, आता गरज नाही, असे तुणतुणे वाजवण्याची वेळ कदाचित कोणावरच येणार नाही. माणसे आपोआप वेळ काढतील. याबाबतीत एक बदल निश्चितपणे जाणवतो. अनेक जण शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजग होत आहेत. रोज सकाळ-सायंकाळ जॉगिंग करताना दिसतात. त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. नंतर काळजी करण्यापेक्षा आधीच दक्षता घेतलेली बरी, असे म्हटले जाते. ते गृहीतक तंदुरुस्तीलाही लागू होते. मनाने आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. मनाच्या तंदुरुस्तीचा एक मार्ग शारीरिक तंदुरुस्तीतून जातो, असे म्हणतात. तो मुद्दाही येथे लक्षात घेतला पाहिजे.