शेतात जे पेरले जाते तेच उगवते हे सामान्यज्ञान आहे. बाभळीची बी पेरली आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला आंबे लागणार नाहीत. काटेरी झुडुपच उगवणार. जातीपातींच्या विषवल्लीचे तसे झाले आहे. जातीपातीची विषारी मुळे समाजात खोलवर रुजली आहेत आणि तिला मोठ्या प्रमाणात विषारी फळे लागत आहेत. एरवी पारावर माणसे प्रगतीच्या गप्पा मारतात. समाज किती बदलत चालला आहे यावर व्याख्यान झोडतात. पण वेळ आली की जातीचाच विचार करतात. एकदा का भेदाभेदांच्या मुद्यावरून विवेक हरवला की माणसे तर-तमचा विवेक गमावतात. असे झाले की बुद्धिमता आणि तिची आराधना करून मिळवलेले यश देखील माणसे त्यांच्याही नकळत जातींच्या तराजूत तोलतात.
बुद्धिमत्ता कोणाचीही मक्तेदारी नाही याची जाणीव होतच नाही. जातिबाह्य विवाह अजूनही स्वीकारार्ह नाहीत. जातीपातींच्या वृथा अभिमानापायी माणसे प्रसंगी त्यांचे माणूसपण देखील हरवून बसतात. समाजातील असे भेदाभेद नाहीसे करण्यासाठी संत आणि समाजसुधारकांनी कष्ट उपसले. त्यांचे आयुष्य वेचले. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे.. स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे.. असे संत जगनाडे महाराज म्हणतात. असे दाखले सगळ्याच संत साहित्यात सापडतात. ते अंमलात देखील आणायचे असतात याचा विसर सदासर्वकाळ संतांच्या नामाचा जयघोष करणार्या सर्वांना पडला आहे. जातीपातींवरून समाजाच्या या भरकटलेपणाचे पाप मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांच्या माथी मारले जाऊ शकेल.
संधी मिळेल तेव्हा राजकारणी, नेते मंडळी, त्यांचे कार्यकर्ते, पक्षपुरस्कृत सामाजिक संस्था आणि त्यांच्यामागोमाग सामान्य माणसे देखील संधी मिळेल तेव्हा जातीपाती नको असे मत हिरीरीने मांडतात. तरीही त्यांचे उच्चाटन होत नाही. कारण, तसे मनापासून कोणालाच वाटत नसावे. राजकीय पक्षांचे सगळे राजकारणच जातीपातींवर आधारीत बनले आहे. राजकीय आणि सत्ता स्वार्थासाठी जातीचेच गणित सगळे पक्ष मांडतात. विशेषतः, निवडणुकीच्या तिकीट वाटपात तर जात हाच मोठा आधार बनताना आढळतो. तोच दृष्टिकोन कार्यकर्त्यांमध्ये पाझरतो. किती राजकीय पक्ष खरेच जातीवर लाथ मारू शकतील? जातीपातीविरहित राजकारणाचा आदर्श उभा करू शकतील? पण ही विषवल्ली प्रसंगी भयावह रूप घेऊ शकते हा खरा धोका आहे. त्याची प्रचिती आणून देणार्या घटना अधूनमधून घडतात. आताही घडत आहेत.
कोणत्याही घटनेकडे त्याच चष्म्यातून पाहण्याची स्वार्थी खोड सगळ्याच पक्षांना जडली आहे. त्यामुळेच कोणतीही अनुचित घटना घडली, की समाजमाध्यमांवर ध्रुवीकरण अनुभवास येते. सामाजिक मूल्यांचा र्हास घडवून आणणार्या घटनांकडे तटस्थ नजरेने पाहिले जायला हवे. त्याच्या परिणामांचा लेखाजोखा मांडायला हवा असे कोणालाच वाटेनासे झाले आहे. उलट अशा घटना भूतकाळात देखील घडल्या होत्या असे त्यांचे चुकीचे समर्थन केले जाते. स्वायत्त संस्थांना देखील याचे काटे बोचू लागले आहेत. संत आणि समाजसुधारक देखील सुटलेले नाहीत. ज्यांनी भेदांवर कठोर प्रहार केले, त्यांनाच जातीची लेबले लावली जातात. त्यांच्या विचारांचे आचरण हीच खरी त्यांची आठवण हे कोणाला पटत नाही किंवा त्यांना पटवून घ्यायचे नाही. अशी ही गुंतागुंत आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल याची भीती बाळगण्याची वेळ आली आहे.पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल, स्वा. सावरकर अशा नेत्यांचा समाजावर प्रचंड प्रभाव आणि नियंत्रण होते. लाखो लोक त्यांचा शब्द झेलत. अगदी मौन देखील धारण करत. कारण ते नेतेही देशाचाच विचार करत. त्यासाठी प्राणांचे मोल चुकवण्याची त्यांची तयारी होती. ‘बोले तैसा चाले..’ किंवा ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’, असेच त्यांचे आचरण होते. त्याचा नैतिक दबाव त्यांच्या कार्यकर्त्यावर नसता तरच नवल. आता तशी खात्री कोणी देऊ शकेल का? आधी केले आणि मग सांगितले असे आचरण आढळू शकेल का? पण घडणार्या घटनांचा सगळ्यांनी मिळून विचार करण्याची वेळ आली आहे. कारण, लोकांची माथी फिरायला कोणताही मुद्दा पुरा होतो. तसे ते फिरले आणि कोणाचेही नियंत्रण नसेल तर समाजाला फुटीच्या उंबरठ्यावर यायला वेळ लागणार नाही.




