अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफवरून सुरू झालेले रणकंदन सुरूच आहे. ट्रम्प महाशय रोजच्या रोज भारताला अडचणीत आणण्याचा उद्योग करत असताना रणनीतीच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक पावलाला मात देण्याच्या भारताच्या भूमिकेने जग अचंबित आहे. अमेरिका ही महासत्ता असल्याने भारताला काळजीपूर्वक धोरण आखावे लागणार आहे. टॅरिफ बडग्यामुळे उत्पादन रोजगारक्षम क्षेत्रे प्रभावित होणार आहेत यात शंकाच नाही.
खेळणी, फर्निचर, इलेट्रॉनिक्स, औषधे अशा क्षेत्रांचा निर्यातीत मोठा वाटा आहे. या क्षेत्रांवर आधारित लघुउद्योगांची संख्या प्रचंड आहे, जे कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी रोजगार पुरवतात. त्यांना मोठाच फटका बसण्याची भीती व्यक्त होते आहे. तशी चिन्हेही दिसू लागली आहेत.
टॅरिफ अमलात आणण्याच्या भूमिकेत आणि टॅरिफ लागू करण्याच्या अंतिम मुदतीत ट्रम्प वारंवार बदल करत असले तरी अनेक ऑनलाइन कंपन्यांनी भारताकडून माल घेण्याच्या बाबतीत सावध पवित्रा घेतला आहे. भारताच्या पवित्र्यामुळे ट्रम्प यांच्या भूमिकेत काही बदल होईल का? दोन्ही देश आणि त्यांच्या प्रमुखांमधील बहुचर्चित मैत्री धोयात येईल का? टॅरिफ नक्की कधीपासून अंमलात आणले जाईल? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. टॅरिफ जाहीर केल्यानंतर भारत त्याची भूमिका बदलेल या ट्रम्प यांच्या अपेक्षेला भारताने घेतलेल्या ठाम भूमिकेने सुरुंग लावला आहे.
भारत ठाम विरोध करेल अशी ट्रम्प यांची अपेक्षाच नव्हती. दुटप्पीपणा आणि ट्रम्प यांची मनमानी उघड झाली. अमेरिकेचे भारताविषयीचे पुतना प्रेम उघड झाले. अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला झुकते माप दिले. पाकिस्तान विषयीचे त्यांचे प्रेम कधीच लपलेले नाही. ऑपरेशन सिन्दुरनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्यांबरोबर मेजवानी देखील झोडली. एवढेच नव्हे तर या मोहिमेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न देखील वारंवार केला. जगाच्या नकाशावर भारत प्रभावशाली बनू नये म्हणून पाकिस्तानचा कायमच हत्यार म्हणून वापर केला. तसा वापर होऊ देणे ही पाकिस्तानसाठी सर्वार्थाने अपरिहार्यता असू शकेल कदाचित. पण, भारताने मात्र पहिल्या दिवसापासून ठाम भूमिका घेतली आहे.
भारतीय जनतेची मानसिकता, देशाची समाजरचना, आर्थिक स्तर लक्षात घेता जनतेला सरकारी संरक्षण आवश्यक मानले जाते. शिवाय, त्याला एक दुसरी बाजू आहे. ते न जपणार्या पक्षाला त्याची फार मोठी राजकीय किंमत मोजावी लागू शकते. हे ट्रम्प यांना कसे समजणार? अमेरिकाहित प्रथम ही त्यांची भूमिका भारताला मान्य नाही. रशियाशी मैत्री त्यांना नेहमीच खुपत आली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये हा मुख्य उद्देश आहे. पण, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा रशिया दौरा भारताची भूमिका स्पष्ट करणारा ठरतो. भारताने घेतलेली भूमिका ही, भारताच्या जागतिक राजकीय, भौगोलिक, व्यापारउदीम, विकसित-अविकसित देश अशा विविध पातळ्यांवरील बदलत चाललेल्या स्थानाची निदर्शक मानली जाते. या क्षेत्रांचा नकाशा बदलेल का, असेही अभ्यासकांना वाटते.
ट्रम्प यांना फोन करण्यापेक्षा मी पुतिन किंवा मोदी यांना फोन करेन, असे ब्राझीलसारख्या देशाच्या प्रमुखांनी म्हटले. आज जरी शंभरपेक्षा जास्त देशांनी अमेरिकन टॅरिफसमोर मान झुकवली असली तरी भारतामुळे अनेक गरीब व अविकसित देशांना बळ मिळू शकेल असे आंतरराष्ट्रीय संबंध विश्लेषक मानतात. अमेरिकेला ते कसे चालेल? अमेरिकेच्या निर्णयाचे पडसाद खुद्द अमेरिकेतच दिसू लागले आहेत. अनेक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. अमेरिकेचे माजी रारष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी घरचा आहार दिला आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत अमेरिकेपासून दूर चालला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाटोनेही मतप्रदर्शन केले. ट्रम्प यांनी टॅरिफ निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा याचा एक अर्थ काढला जाऊ शकेल.
पण, जग काहीही म्हणत असले तरी लहरी ट्रम्प यांना कळले तरी वळणार नाही. त्यांची प्रत्येक कृती हेच अधोरेखित करते. ट्रम्प यांच्या लहरीपणाची किंमत जग मोजणार आहे. टॅरिफ अमलात आल्यानंतर नेमके काय घडेल हे कोणीच सांगू शकणार नाही. ट्रम्प यांची अहंमन्यता अमेरिकेला अकाली सत्ता पालटाकडे घेऊन जाईल का? असे अनेक प्रश्न आहेत.




