पर्यटनस्थळांवर बंदी घातली जाण्याचा किंवा मर्यादा आणण्याचा सिलसिला सुरूच आहे. ओळखपत्र आणि नोंदणीशिवाय कळसूबाई शिखरावर जाण्यास बारी आणि जहागीरदारवाडी या ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे बंदी घातली आहे. त्याची जी कारणे सरपंचांनी जाहीर केली ती तीच आहेत ज्या कारणांसाठी विविध पर्यटनस्थळांवर बंदी घातली जात आहे. मद्यपान करणे, गोंधळ घालणे, गोंगाट करणे, अंगविक्षेप करत नाचणे आणि रिल्स बनवण्यासाठी जीव धोक्यात घालणे. अनेक धबधबे, पावसाळी ठिकाणे, धरणे किंवा अभयारण्ये या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
मांगीतुंगी परिसरदेखील बंद करण्यात आला आहे. अशा बंदीवर अनेक ठिकाणचे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत असल्याचे सांगितले जाते. त्यांची भावना समजण्यासारखी आहे. कोणत्याही प्रकारचे पर्यटन रोजगारपूरकच असते. अकुशल व्यक्तींच्या हातालासुद्धा काम मिळू शकते. अनेक धबधबे पावसाळ्यातच वाहतात. हाच काळ त्या-त्या ठिकाणच्या लोकांसाठी चार पैसे गाठीला बांधण्याची संधी मिळवून देतो. बंदीमुळे तात्पुरता रोजगार हिरावून घेतला गेल्याची तक्रार लोक करत असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. पर्यटकांचा जीव जातो म्हणून सरसकट ठिकाणे बंद करून शासनाला जबाबदारीतून मोकळे होता येणार नाही.
बंदी हा उपाय नाही याचा विसर शासनाला पडला असावा का? बंदी घालून पर्यटकांचा वावर थांबला आहे का? पर्यटक गर्दी करतच आहेत. तरीही बंदी घालून तात्पुरती वेळ मारून नेण्याचा हा प्रयत्न मानावा का? तथापि अशी बंदी घालण्याची वेळ प्रशासनावर का येते याचा विचार पर्यटकांनीही करायला हवा. सद्यस्थितीत बहुसंख्य पर्यटनस्थळी उन्मादी वातावरण आढळते. पर्यटकांनी उच्छाद मांडल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहेत. पर्यटनस्थळे सुरक्षित करणे शासनाचे कर्तव्य आहे. तद्वतच शासनाने काढलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियम पाळणे ही पर्यटकांची जबाबदारी नाही का? त्या पातळीवर मात्र अतिरेकच अनुभवास येतो.
घरातील लहान मूल जेव्हा अनाठायी धाडस करू पाहते किंवा घरातील युवा सहलीला जातात तेव्हा पालक त्यांना असंख्य सूचना देतात. पाण्यात उतरू नको, धबधब्याजवळ जाऊ नको, निसरडी ठिकाणे टाळा, निसर्गाशी पंगा घेऊ नका, असे वारंवार बजावतात. मग तीच मोठी माणसे पर्यटनस्थळी त्यांचा जीव धोक्यात का घालत असावीत? केवळ वय वाढले म्हणून वाटेल तसे वर्तन करण्याची मुभा ते घेऊ शकतात का? तात्पर्य, पर्यटकांची सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी आहे याची जाणीव कधी होणार?