Tuesday, May 13, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १२ मे २०२५ - उद्दिष्टानुसार अंमलबजावणी अपेक्षित

संपादकीय : १२ मे २०२५ – उद्दिष्टानुसार अंमलबजावणी अपेक्षित

एक विषय म्हणून योगशास्त्राचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्र्यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली. शाळेसह महाविद्यालयात देखील त्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. योगशास्त्र हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

- Advertisement -

आयुष्यातील त्याचे महत्त्व निदान भारतीयांना तरी वेगळे सांगायला नको. योग केल्यामुळे मनशांती मिळते. एकाग्रता वाढते. स्थूलता कमी होते. स्नायू मजबूत बनतात. रक्ताभिसरण सुधारते. सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते. मन प्रसन्न राहाते. इत्यादी इत्यादी. शारीरिक सुदृढता हा मनःस्वास्थ्याचा एक मार्ग मानला जातो. ‘मन करा रे प्रसन्न.. सर्व सिद्धीचे कारण’ असे संतांनी म्हटलेच आहे. ज्याची माणसांना सध्या नितांत गरज आहे.

पण योग अमलात आणणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. योग शिकण्याची सुरुवात शालेय वयापासून झाली तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ पिढी घडू शकेल. मुलांनाही विविध प्रकारचे ताण असतात. ते कमी होऊ शकतात. एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. वजन नियंत्रित राहाते. लवचिकता, समतोल साधण्याची क्षमता वाढते. यातून मुले सारासार विचार करायला शिकू शकतील. त्यांच्या भावनांचे संतुलन साधू शकतील. यालाच स्वनियंत्रण म्हटले जाऊ शकेल. सध्या विविध कारणांमुळे मुलांमधील अस्वस्थता वाढत आहे. अशी परिस्थिती हाताळणे किती मुले जाणून असतील? भावनांचे नियमन करायला मुलांना शिकवले जात नाही असे मानसतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

परिणामी ती अस्वस्थता जीवघेण्या प्रकारे व्यक्त होतांना आढळते. मित्राचा जीव घेणे, क्रोधाच्या भरात हिंसक कृती करणे अशा घटना अधूनमधून घडतात. ज्यांचे सावट मुलांच्या भविष्यावर पडते. प्रत्येकाच्या बाबतीत अशा घटना विवेकशीलतेने हाताळल्या जाण्याची शक्यता कमीच. त्यामुळे योग्य वयात योगशास्त्राचे संस्कार केले गेले तर मुलांमध्ये सुजाणता रुजण्यास मदतच होऊ शकेल. तथापि त्यासाठी हा निर्णय उद्दिष्टांनुसार अमलात आणला जाणे अपेक्षित आहे. शाळांमध्ये क्रीडा तास वेळापत्रकात बंधनकारक असतात.

शासकीय नियमानुसार वेळापत्रकात त्यांचा समावेश देखील आढळतो. पण किती शाळांमध्ये ते तास फक्त खेळांसाठी वापरले जात असू शकतील? मुलांना मैदानी खेळ खेळायला लावले जात असतील? अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते तास उपयोगात आणले जातांना आढळतात. मैदानी कवायतीऐवजी वर्गातच उपक्रम घेतले जातांना आढळतात. याला काही शाळा अपवाद असू शकतील. तशी संभावना योगप्रशिक्षणाची होणार नाही अशी अपेक्षा करावी का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jammu-Kashmir : भारतीय सैन्याचे जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
नवी दिल्ली | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’...