Tuesday, February 3, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १२ नोव्हेंबर २०२५ - विवेकाची आवश्यकता

संपादकीय : १२ नोव्हेंबर २०२५ – विवेकाची आवश्यकता

देशाची राजधानी पुन्हा एकदा आत्मघातकी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. एका उच्चशिक्षित व्यक्तीने तो घडवून आणला आहे. त्यात निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.फरिदाबादपासून लखनौपर्यंत हे वृत्त लिहून होईपर्यंत पोलिसांनी सुमारे तीन हजार किलो वजनाची स्फोटके जप्त केल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. घडल्या घटनेचा सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरु केला आहे. यानंतरचे अजून काही दिवस घटनेमागचे धागेदोरे लोकांसमोर उलगडत जाऊ शकतील. स्फोेटामागचा उद्देश, त्यामागचे लक्ष्य, स्फोट जाणीवपूर्वक घडवून आणला गेला का? तसे असेल तर त्याच्या नियोजनात किती लोक सामील होते असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

देशात विविध ठिकाणी घडलेल्या उपरोक्त घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, त्यातील दहशतवादी दुवे शोधले जातीलच. देशाच्या एकूणच स्थैर्याचा गळा घोटण्याचे दहशतवादी प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कठोर पवित्रा सरकार घेईल अशी लोकांची अपेक्षा आहे. जेव्हा जेव्हा देशहित पणाला लागते तेव्हा तेव्हा तमाम जनता सरकारमागे खंबीरपणे उभी असते हे जनतेने याआधीही अनेकदा सिद्ध केले आहे. लोकांच्या याच विश्वासाला धक्का लागू नये याची दक्षता घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. दहशतवादाचा, नक्षलवादाचा पूर्ण बीमोड सुरु असल्याचे सरकारकडूनही सांगितले जात होते. गत सुमारे अकरा-बारा वर्षे देशात अपवाद वगळता लोक शांतता अनुभवत होते.अंतर्गत शांततेचा,गत काही दशकांमधील कदाचित हा सगळ्यात दीर्घ काळ मानला जाऊही शकेल.तरीही पुलवामा, पहलगाम घटना घडल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ घडवून आणावे लागले. आता तर देशाची राजधानी हादरली आहे.

YouTube video player

स्फोट छोटा असो की मोठा, त्यात निरपराध नागरिकांचा बळी जातो. तितकी कुटुंबे कायमची उद्ध्वस्त होतात. कटू आणि वेदनादायी अनुभव त्यांच्या पदरी कायमचे बांधले जातात. त्याचा विसर सहजासहजी पडणे त्यांच्यासाठी शक्य नसते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सरकार नेमके काय पावले उचलत आहे किंवा अशा घटनांमागचे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. कारण दहशतवादाची किंमत देश, देशातील सरकार आणि त्यांच्या बरोबरीने लोक देखील चुकवत असतात. यंत्रणांच्या पाठबळावरच लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त-निश्चिन्त असतात. अशा घटनांमागचे आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण आणि त्यामागचे धागेदोरे सगळ्याच सामान्य माणसांना कदाचित समजू शकणार नाहीत. गुप्त पातळीवरच्या सगळ्याच गोष्टी समजाव्यात अशी लोकांचीही अपेक्षा नसते. तथापि देशांतर्गत शांतता धोक्यात का येते हे माहित करून घेणे लोकांचा हक्क मानला जायला हवा. तेव्हा दिल्ली प्रकरण किंवा जप्त केलेली स्फोटके यामागील तथ्य लोकांना समजेल अशी लोकांची अपेक्षा आहे.तपास यंत्रणा घटनांच्या मुळाशी जातील.

सत्य शोधून काढतील. गुन्हेगारांना सोडणार नाही असे पंतप्रधानांनी माध्यमांना सांगितले. तसे व्हायलाच हवे. तथापि सत्ताधार्‍यांच्या हातात देश सुरक्षित आहे असा अनुभव लोकांना यायला हवा हेही खरेच. दिल्ली घटनेमागचा एक पैलू मात्र सर्वाना अस्वस्थ करणारा निश्चित ठरू शकेल. अशिक्षित युवांची माथी भडकावली जातात. दहशतवादासाठी त्यांचा वापर केला जातो असा सार्वत्रिक समज आढळतो. तथापि दिल्लीच्या आत्मघातकी घटनेत सहभागी व्यक्तीचे छायाचित्र माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. तो डॉक्टर होता. या घटनेत सहभागी असल्याच्या आरोपावरून ज्या व्यक्तींना अटक करण्यात आली ते तिघेही डॉक्टरच आहेत. उच्चशिक्षित व्यक्तींचाही दहशतवादातील सहभाग देशाची आणि यंत्रणांची चिंता वाढवणारा ठरू शकेल.

या घटनेनंतर देशपातळीवर हाय अलर्ट लागू केला गेला आहे.या घटनेचे धागेदोरे भूतकालीन दहशतवादी घटनांशी असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातील तथ्य यथावकाश समोर येईलच. तथापि हा राजकारणाचा विषय नाही. पण तसा प्रयत्न समाजमाध्यमांवर सुरु झाला आहे. कोणत्याही घटनेवरून सरकारवर टीका करणे लोक समजू शकतात. तथापि राजकारण करण्यासारखे अनेक मुद्दे असतात. दहशतवादी घटना किंवा तशी वृत्ती यावर राजकारण होऊ शकत नाही इतका विवेक सगळेच राजकीय पक्ष आणि लोकही दाखवतील एवढीच अपेक्षा.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...