आंतरधर्मीय-जातीय विवाह समाजात अजूनही सार्वत्रिक स्तरावर स्वीकारार्ह नाहीत. त्यामुळे अनेक जोडप्यांचा प्रसंगी जीवही धोक्यात येऊ शकतो. अशा गरजू जोडप्यांसाठी शासकीय विश्रागृहातील काही खोल्या अतिथीगृह म्हणून उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला नुकतीच केली. अशा पुढाकाराची प्रवाहपतित होणार्या जोडप्यांना किती गरज असू शकते हे दर्शवणार्या घटना अधूनमधून घडतात.
राजस्थानमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भिलवाडा जिल्ह्यातील रतनपुरा गावातील एका युवतीने जातीबाह्य विवाह केला. त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या संतापाने टोक गाठले. वडिलांनी तिचे श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना त्यासाठी आमंत्रित करणार्या पत्रिकाही वाटल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. जातीपातींच्या पलीकडे एक समाज आणि माणुसकीचा-मानवतेचा धर्म असतो. त्याचा स्वीकार लोकांनी करावा यासाठी समाजसुधारक आणि संतांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण त्याबाबतीत समाज अजूनही किती मागासलेला आहे हेच अशा घटना दर्शवतात. कुटुंबातील कोणाचाही मृत्यू दुःखदायक असतो.
जातीपातीचा वृथा अभिमान इतका खोलवर रुजला आहे की पोटचा गोळा जिवंत असतानाही त्याला मृत समजण्याइतकी माणसे निष्ठूर होऊ शकतात. अशा अनेक सामाजिक मुद्यांवर समाजात दुटप्पी वर्तन आढळते. सध्या समजात संविधानावर घमासान सुरू आहे. भारतवासियांना संविधानाचा अभिमानच वाटतो. तथापि त्याच संविधानाने लोकांना समानतेची, समतेची आणि समरसतेची शिकवण दिली आहे तिचा मात्र लोकांना सोयीस्कर विसर पडताना आढळतो. महिलांना देवी म्हणून पुजले जाते. तथापि जातीबाह्य विवाह केला म्हणून मुलीचा आणि अनेकदा तिच्या पतीचाही जीव घेतला जातो. अनेकदा जातीबाह्य विवाह प्रेमविवाह आढळतात.
जे काही करतो तो अपत्यांच्या सुख आणि समाधानासाठी करतो असे त्यांचे पालक अभिमानाने सांगतात. मग आपल्या मुलांच्या निर्णयात त्यांना त्यांचे सुख का दिसत नसावे? त्यांच्या पसंतीच्या जोडीदाराशी विवाह करून ते आनंदी आणि सुखी राहू शकतील हे लक्षात का येत नसावे? जातीपातीची झापडे इतकी घट्ट असू शकतात का? वास्तविक आंतरजातीय विवाह हे जातीपातीविरहित समाजव्यवस्थेकडे जाणारे पाऊल ठरू शकतात. त्या एका निर्णयामुळे दोन भिन्न जातप्रवाह एकत्र येऊ शकतात. नव्हे अनेक कुटुंबात येतातदेखील. अनेक कुटुंबे असे विवाह आनंदाने स्वीकारतात. त्यांचा तो समंजस निर्णय त्यांच्या घराचे गोकुळ करू शकतो. अशा कुटुंबांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे.