Thursday, November 14, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १३ नोव्हेंबर २०२४ - नायलॉन मांजाची दहशत सुरु

संपादकीय : १३ नोव्हेंबर २०२४ – नायलॉन मांजाची दहशत सुरु

बहुसंख्य घरांवरची दिवाळीची रोषणाई अजून कायम आहे. अधूनमधून फटाक्यांचे आवाज सुद्धा येत आहेत. भोवताली दिवाळीचा माहोल अजून तसाच असतांनाच नायलॉन मांजा आणि त्याचा संभाव्य धोका चर्चेत आला आहे. संक्रांतीची चाहूल देखील लागलेली नाही. तरीही नायलॉन मांजामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा हकनाक जीव गेला. ही दुर्दैवी घटना नाशिकच्या वडाळा गावात नुकतीच घडली. खेळता खेळता त्या मुलाचा पाय लोंबकळणार्‍या नायलॉन मांजात अडकला.

पाय सोडवण्याच्या नादात त्याचा पायच कापला गेला आणि त्या मुलाचा मृत्यू झाला. आगामी दोन महिने या मांजाचा वापर किती दहशत माजवू शकेल त्याची ही चुणूक म्हटली जाऊ शकेल. वास्तविक या मांजामुळे होणारे अपघात नवे नाहीत. संक्रांतीच्या काळात अशा घटना दरवर्षी घडतात. त्यात माणसे आणि पशुपक्ष्यांचा बळी जातो. माणसांच्या मृत्यूची चर्चा तरी होते. पक्षिमित्रांव्यतिरिक्त मुक्या जीवांच्या मृत्यूची दखल फारशी घेतली जाताना आढळत नाही. नायलॉन मांजावर बंदीचा फार्स दरवर्षी पार पडतो. बंदीचे आदेश निघतात. विक्रेत्यांवर धाडी पडतात. त्यांच्याकडून किती मांजा जप्त केला त्याचे वृत्त छापून येते. अर्थात या मांजाच्या वापरावर बंदी घातली जाण्यासाठी न्यायसंस्थेला स्वयंस्फूर्त पुढाकार घ्यावा लागला होता.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले होते तरीही या मांजाची वर्षानुवर्षे छुपी विक्री होते. तो वापरला जातो आणि त्यामुळे अपघातही होतात. नोव्हेंबर महिन्यातच नायलॉन मांजा वापरात आला असावा का? की मुलांकडे गेल्या वर्षीचाच शिल्लक होता? की बंदीच्या भीतीने आत्तापासूनच छुप्या पद्धतीने तो विकला जात असावा? अशा विक्रेत्यांचा शोध घेणे अवघड नसावे. हे झाले विक्रीचे. पण मुळात याच्या बेकायदा उत्पादनाचे काय? उत्पादन झाले की त्याच्या विक्रीचे प्रयत्न केले जाणारच. मग त्यावर बंदीचा केवळ फार्स होणेही स्वाभाविक.

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने 2017 मध्येच नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी घातल्याचे सांगितले जाते. यासंदर्भातील जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी नायलॉन मांजाच्या बेकायदा विक्रीची कबुली प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. कबुली देऊन यंत्रणेची जबाबदारी संपत नाही, तर त्याचे उत्पादन संपूर्णपणे थांबणे आवश्यक आहे याची जाणीव कधी होईल? त्यासाठी अजून किती मांजा बळी जावे लागतील? संक्रांतीला अजून महिना बाकी आहे पण संबंधितांच्या नाकर्तेपणामुळे म्हणा किंवा दुर्लक्षामुळे, नायलॉन मांजाची दहशत सुरु झाली आहे, याची दखल घेतली जाईल का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या