जे लोकांना माहित आहे तेच त्यांना पुन्हा सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री गडकरी यांनी काय साधायचे होते? आपल्या नशिबी फक्त खड्डेयुक्त रस्तेच आहेत हे लोकांनी कधीचेच स्वीकारले आहे. फक्त त्याचे कारण मंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले इतकेच. नगरसेवक, ठेकेदार आणि अभियंत्यांना खराब रस्ते हवे असतात. त्यांच्या या वृत्तीला राजकारणी आणि मंत्रीही तितकेच जबाबदार आहेत. सरकारी अभियंत्यांमधील ‘चल जाता है’ वृत्ती धोकादायक आहे, असे वक्तव्य गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. ते ऐकताना किंवा वाचताना भ्रष्टाचाराच्या साखळीची फार मोठी पोलखोल झाली असा आभास यातून श्रोत्यांमध्ये निर्माण झाला असे गृहीत धरले तरी ते उघड सत्य आहे.
सर्वच पातळ्यांवर यंत्रणेत खोलवर मुरलेला भ्रष्टाचार लोकही ओळखून आहेत. किंबहुना, त्याचा पदोपदी अनुभवही लोक घेतच असतात. किरकोळ कामांसाठी सुद्धा लोकांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे का झिजवावे लागतात? ऑनलाइनच्या जमान्यात कागदांची भेंडोळी का जोडावी लागतात? शैक्षणिक दाखल्यांचे उदाहरण या ठिकाणी चपखल ठरू शकेल. शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक दाखले तरी वेळेत मिळतात का? तात्पर्य, टेबलाखालच्या व्यवहारांमुळे लोकांचा जीव अनेकदा टांगणीला लागतच असतो. तेच गडकरी यांनी रस्त्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगितले. पण त्याच्या पुढे काय? भ्रष्टाचाराची साखळी लोकांनी उद्ध्वस्त करावी अशी सत्ताधार्यांची अपेक्षा आहे का? लोक ते काम करू तरी शकतील का? ती त्यांची जबाबदारी आहे का? तसे करणे त्यांना शय असते तर कबुली देण्याची वेळ आलीच नसती.
सामान्य माणसे विविध प्रकारचे कर भरतात. त्या बदल्यात दर्जेदार नसले तरी चालतील; पण निदान खड्डेमुक्त रस्ते मिळावेत इतकीच त्यांची अपेक्षा आहे. ती पूर्ण होणे एक प्रकारे सत्ताधार्यांवर अवलंबून आहे. कारण यंत्रणेची अकार्यक्षमता, उणिवा आणि भ्रष्टाचार याला तेच आळा घालू शकतात. नव्हे, संबंधित खात्यांचे मंत्री म्हणून यंत्रणेकडून जनकल्याण करून घेणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. तथापि, मंत्रीच जर त्यासंदर्भात हतबलता व्यक्त करत असतील तर लोकांनी कुठे जावे? कोणाच्या तोंडाकडे पाहावे? हे म्हणजे, रुग्णाच्या आजाराचे निदान केले पण उपचार करण्यास डॉटरांनी असमर्थता व्यक्त करण्यासारखे झाले. खरे हतबल तर लोकच आहेत. ते बिनबोभाट कर भरतात. सगळी बिले वेळेत भरतात. कारण बाकी ते काहीच करू शकत नाहीत. धक्के खात, शरीरातील हाडेकाडे दुखवून घेत, वाहनांचे खुळखुळे करून घेत आणि खिशाला खार लावून भरलेल्या इंधनाचा धूर करत खड्डे चुकवत गाडी चालवण्यातील लोकांची हतबलता गडकरी देखील जाणून असतील.
खड्डेयुक्त रस्ते हे अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. अपघातांमध्ये मृत्यू पावणार्यांमध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे हे गडकरी यांनीच एकदा सांगितले होते. अशा घटना सोसणार्या शेकडो कुटुंबांच्या दुःखाचे पाप या साखळीचेच आहे. पण त्याची भरपाई मात्र लोकांना करावी लागते ही खरी त्यांची हतबलता आहे. कामात बेइमानी करणार्यांवर कारवाई करेन, कामात चूक झाली नाही तर सोडणार नाही, असा दम गडकरी यांनीच एका कार्यक्रमात बोलताना दिला होता. तशी कारवाई किती जणांवर झाली असू शकेल? लोकांचा तरी तसा अनुभव नाही. आणि कारवाई करू, कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, ही वाक्ये आता लोक मनोरंजन म्हणूनच घेतात. सगळ्याच कारभार्यांच्या अशा घोषणा ऐकून तात्पुरते खुश होणे ही लोकांची खरी हतबलता आहे. पण या रस्ते बांधणीतील खाबुगिरीवर मात करू शकेल याचा एक मार्ग गडकरी यांनीच त्यांच्या परीने दाखवला आहे.
सिमेंटचे रस्ते कारखान्यातच बनले पाहिजेत व क्रेनने ते आणून बसवले पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केले. खासगी कंपन्यांनी तयार केलेल्या रस्त्यांना खड्डे पडल्याचे अभावानेच आढळते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने वाहनचालकांच्या मनात आशेची किरणे बहुधा लकाकणार नाहीत. कारण सरकारी घोषणांमधील फोलपणा ते नेहमीच अनुभवतात. सत्ताधार्यांनी केलेली एक तरी घोषणा रोज प्रसिद्ध होतेच. जिचे पुढे काय होते हे लोकांना कधीच कळत नाही. त्यामुळे, कसेही बनवा. कुठेही बनवा पण खड्डेमुक्त रस्ते बनवा अशीच त्यावरची लोकांची प्रतिक्रिया असू शकेल.




