Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १३ सप्टेंबर २०२४ - प्लास्टिकचा भस्मासूर संपेल?

संपादकीय : १३ सप्टेंबर २०२४ – प्लास्टिकचा भस्मासूर संपेल?

बुद्धी आणि विचारशक्ती मानवाला प्राणीसृष्टीपासून वेगळे ठरवते. निसर्गसृष्टीत माणूस सगळ्यात जास्त उत्क्रांत मानला जातो. पण या संपन्न वारशाचा समाजाला विसर पडत चालला असावा का? विचारशक्ती क्षीण होत चालली असावी का? त्याशिवाय अंतिमतः मानवी अस्तित्वाला घातक गोष्टींचा अंगिकार त्याला टाळता येत नसावा.

प्लास्टिकचेच उदाहरण घेऊयात. माणसाच्या बेपर्वा वर्तणुकीमुळे प्लास्टिक कचर्‍याचा भस्मासूर मानवाच्याच डोक्यावर हात ठेवेल अशी परिस्थिती निर्माण होण्यात मानवाचा मोठाच हातभार लागतो. यासंदर्भात ‘नेचर’ नियतकालिकात एक अहवाल प्रकाशित झाला आहे. जगात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारा देश भारत असल्याचा निष्कर्ष त्यात नमूद असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.

- Advertisement -

देशात दरवर्षी सुमारे 95 कोटी टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो, असे त्यात म्हटले आहे. याला सरकारची धोरणात्मक अनास्था मुख्यतः कारणीभूत आहेच. तथापि लोक करत असलेला उपलब्ध प्लास्टिकचा बेसुमार वापर आणि तो झाल्यावर कचरा फेकून देणे तितकेच जबाबदार आहे. हा कचरा किती घातक आहे, निसर्ग आणि प्राणीसृष्टीचा श्वास त्यामुळे कसा कोंडतो, प्रसंगी मुक्या जीवांचा हकनाक मृत्यू कसा ओढवतो, पिण्याच्या पाण्यात आणि मानवी रक्तातदेखील प्लास्टिकचे मायक्रो कण कसे आढळत आहेत हे बहुधा सगळेच जाणून असावेत. ते समजून घेण्याला फार विचार करण्याची गरज नसावी.

सृष्टीची दुर्दशा दाखवणारी छायाचित्रेही यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरतात. तरीही त्याचा बेसुमार वापर करण्याचा आणि कचरा मनमानी पद्धतीने फेकण्याचा मोह माणसे का टाळू शकत नसावीत? प्लास्टिकचा वापर अपरिहार्य आहे असे माणसाला ठामपणे का वाटत असावे? जीवघेण्या संकटाशी चार हात करून जीव वाचवण्यासाठी माणूस प्रचंड धडपड करतो. प्रसंगी त्यासाठी पाण्यासारखे पैसेदेखील खर्च करतो. मग जीवघेणे ठरू शकेल असे प्लास्टिकचे संकट त्याला का दिसत नाही? एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर आणि उत्पादनावर सरकार वारंवार बंदी घालते आणि लोक तिचा फज्जा उडवतात.

बुद्धीचा अभिमान मिरवणार्‍या मानवासाठी हे फार भूषणावह नाही. सरकारने यासंदर्भात कठोर धोरण ठरवून त्याची तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी करणे हे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहेच, पण त्याला लोकसहभागाची जोडही गरजेची आहे. प्लास्टिक कचर्‍याला आळा नक्की घातला जाऊ शकेल पण त्यासाठी माणसांना त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. माणसाने ठरवले तर एकदा वापरून फेकून द्याव्या लागणार्‍या प्लास्टिकचा वापर आटोक्यात आणणे अशक्य नाही. कारण त्याचाच कचरा जास्त प्रमाणात निर्माण होतो. त्यासाठी छोट्या छोट्या सवयी अंगिकाराव्या लागतील, अन्यथा प्लास्टिकच्या कचर्‍याने मानवी श्वास कोंडण्याचा दिवस फार दूर नाही. तो दिवस उगवू न देणे माणसाच्याच हातात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या