पैशांचा पाऊस कधीही पडू शकत नाही. कोणीही पाडू शकत नाही याच्याशी लहान मुलेदेखील सहमत होऊ शकतील. कोणतीही सरकारी बँक पैसे चारपट तर सोडाच पण दामदुप्पटही करून देऊ शकत नाही. तरीही शहाणी आणि सुशिक्षित माणसे अशा भूलथापांना बळी कसे पडतात? ओटीपी, पासवर्ड, वैयक्तिक माहिती कोणाला सांगू नका असे आवाहन सरकार सातत्याने करते. तरीही लोक फसतात आणि आयुष्याची पुंजी गमावतात.
गुजरातमधील 12 लोकांनी असेच एका तथाकथित बाबाच्या मागे लागून त्यांचे प्राण गमावले. त्या बाबाला नुकतीच अटक करण्यात आल्याचे माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. अटकेनंतर बाबाचे 12 वर्षांतील उपरोक्त कारनामे उजेडात आले. काळ्या जादूच्या सहाय्याने पैसे चारपट करून देण्याचे आमिष तो लोकांना दाखवायचा आणि त्यांना लुटायचा. प्रसंगी काहींची हत्या करायचा.
या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला ही बाब अलाहिदा. तथापि एखादी व्यक्ती पैसे चारपट करून देऊ शकते असे लोकांना वाटते तरी कसे, हा मूळ मुद्दा आहे. गरिबी हे त्याचे एक कारण सांगितले जाते. तरीही हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो हे समजण्याइतकादेखील विचार माणसांनी करू नये का? पैसे दामदुप्पट करून देणे शक्य असते तर सरकारी बँकांनीच करून नसते का दिले? मोह किंवा हाव हेच यामागचे मूळ कारण असावे.
जास्तीची हाव माणसाला नडते. गरजेपेक्षा जास्तीची हाव गोत्यात आणते.. अंथरूण पाहून पाय पसरावेत किंवा ठेविले अनंते तैसेचि राहावे आणि जे मिळाले त्यात माणसानेसमाधान शोधावे असा मागल्या पिढीचा मंत्र होता. नव्या पिढीचे फंडे वेगळे असू शकतील. तथापि मूल्ये कशी बदलतील? उलट नवी पिढी शिकलेली आहे. तंत्रज्ञान स्नेही आहे. त्यामुळे त्यांनी याबाबतीत अधिक सजग असणे अपेक्षित नाही का? तंत्रज्ञानातील फसवणुक टाळण्याचे उपाय सांगून त्यांनी लोकांना शहाणे करणे समाजाला अपेक्षित आहे.
तथापि असे गुन्हे मात्र वाढत आहेत आणि भलीभली माणसे त्याला बळी पडताना आढळतात. राज्यपाल बनवतो असे सांगून एकाने दुसर्याला लाखो रुपयांना लुटले. कोणीही सोम्यागोम्या राज्यपाल बनवू शकत नाही हे सुशिक्षित माणसांना माहित असू नये का? याच लालसेचा गुन्हेगार गैरफायदा घेतात. ते दोषी आहेतच. तथापि हाव बाळगली म्हणून लोकही तेवढेच दोषी मानले जाऊ शकतील का? कारण लालसा नसेल तर फसवणूक होणारच नाही.