Tuesday, October 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १४ सप्टेंबर २०२४ - प्रयत्नच करावे लागतील

संपादकीय : १४ सप्टेंबर २०२४ – प्रयत्नच करावे लागतील

बदलत्या काळाची गरज म्हणून मुलांच्या हाती सोपवलेला मोबाईल त्यांच्या हातातून काढून घेण्याची वेळ पालकांवर ओढवली आहे. या मुद्यावर परस्पर विरोध समाजाच्या अनुभवास येतो. करोनाकाळात शाळा बंद होत्या. त्याकाळात मुलांचे शिकणे सुरू ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. तसे अभिनव प्रयोग राबवणार्‍यांचे विशेष कौतुकही झाले. त्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल सोपवणे अनेकांसाठी अपरिहार्य मानले गेले.

कोणत्याही बदलाचे चक्र उलटे फिरवणे अवघडच. तसेच याबाबतीत झाले. करोना साथ संपुष्टात आल्यावर शाळा सुरू झाल्या, पण मुलांच्या हातातली मोबाईल सुटला नाही. किंबहुना त्यांचा त्यावरचा वेळ वाढतच गेल्याचे आढळते. आता शाळाही डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. मुले आणि मोबाईलची संगत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मारक ठरत असल्याचा निष्कर्ष अनेक अभ्यास नोंदवतात. नुकताच प्रसिद्ध झालेल्या युनेस्कोचा अहवाल त्यापैकीच एक. त्यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता बाधित होत असल्याचे त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

शिक्षणतज्ज्ञ, सर्जनशील शिक्षक आणि सुजाण पालकांना हा मुद्दा चिंतेचा वाटू लागला असावा. त्यावर ज्यांच्या त्यांच्या पातळीवर उपाय योजले जाताना आढळतात. नगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या एका शाळेत मोबाईल वापरणार नाही, त्यावर गेम खेळणार नाही, अशी शपथ दिली जाते. त्यात पालकांना सहभागी करून घेतले आहे. शपथ मोडल्याची पालकांची तक्रार आल्यास प्रार्थनेच्या वेळी त्या विद्यार्थ्याचे नाव जाहीर केले जाते. त्याला सुधारणा करण्यास आठ दिवसांचा अवधी दिला जातो. सुधारणा झाल्यावर त्याच मुलाचे जाहीर कौतुक केले जाते.

याविषयीचे सविस्तर वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. असे निर्णय याआधीही अनेकदा घेतले गेले आहेत. नाशिक देवळा तालुक्यातील दहिवड त्यापैकीच एक गाव. मुलांनी शाळेत मोबाईल आणू नये असा निर्णय ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतला होता. मुलांच्या शिक्षणावर होणार्‍या विपरीत परिणामांपुरती ही समस्या मर्यदित नाही. ती व्यापक आहे कारण हातातील मोबाईलचे अडनिड्या वयाच्या मुलांवर अनेक मानसिक दुष्परिणाम होतात. ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतील. कारण सवयी बदलणे वाटते तितके सोपे नाही.

एखादे व्यसन सुटणे किती अशक्यप्राय असते हे मोठी माणसे जाणून असतात. मुलांमध्ये मूल्ये रुजवण्यासाठी सुजाण पालकदेखील विविध प्रयोग करतात. त्याचाच विस्तारता परिघ म्हणून अशा निर्णयांकडे पाहिले जाऊ शकेल का? कारण प्रयोग करत राहिले तरच निष्कर्ष निघू शकतील. त्यांच्यावर चर्चा होऊ शकेल. त्यातूनच बदल घडण्याची शक्यताही बळावेल. त्याच दृष्टिकोनातून उपरोक्त प्रयोगाकडे पाहिले जाणे आवश्यक आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या