Thursday, January 8, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : १५ फेब्रुवारी २०२५ - आरोग्यसाठीचा अनुभवी सल्ला

संपादकीय : १५ फेब्रुवारी २०२५ – आरोग्यसाठीचा अनुभवी सल्ला

मानवी आरोग्याची गुंतागुंत वाढतच आहे. भूतकाळात कधीही न ऐकलेले विषाणू अचानक हल्ला करतात. अनेकांचे आयुष्य अकाली संपुष्टात आणतात. परिस्थिती कशीही असली तरी कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सल्ल्यांसाठी माणसांनी समाज माध्यमांचा आधार घेऊ नये. त्यासाठीचे ते योग्य माध्यम नाही, असा सल्ला डॉ. शिव सरीन यांनी नुकताच दिला.

चिकित्सा विज्ञान कार्यासाठी त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘ओन युअर बॉडी’ पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्यांच्या सल्ल्याचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी त्यांचा एवढा परिचय पुरेसा ठरावा. त्यांनी समाज माध्यमांवर वाहणार्‍या आरोग्यविषयक मजकुराच्या धबधब्याची अचूक चिकित्सा केली आहे. आरोग्याचे दीर्घ सल्ले आणि कानमंत्र देणारा मजकूर एखाद्या नदीसारखा अखंड वाहत असतो. या माध्यमांचे समाजावर गारूड आहे. ते लक्षात घेऊन अनेक तज्ज्ञ या माध्यमांचा उपयोग जनमानसाची समज वाढवण्यासाठी करतात.

- Advertisement -

आरोग्याचे भान देण्याचा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करतात हे खरे. तथापि तो मजकूर सर्वच वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना त्यातील गर्भितार्थ समजणे शक्य नाही, याच्याशी ते तज्ज्ञही सहमत होऊ शकतील. समाज माध्यमांवरील मजकुराची शहानिशाही सामान्य माणसे करून घेऊ शकत नाहीत. शिवाय आरोग्याच्या बाबतीत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे वास्तव आहे. परिणामी समाज माध्यमांवरील सल्ले माणसांनी विचार न करता अमलात आणले तर ते प्रसंगी त्यांच्या जीवाशी खेळ ठरण्याचा धोका नाकारता येणार नाही. हेच डॉ. सरीन यांना सुचवायचे असावे.

YouTube video player

याची एक दुसरी बाजूही असू शकेल. समाज माध्यमांवरील सल्ले माणसे अमलात आणत असावेत का? अनेकांचा तो नाईलाज असू शकेल का? सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उणिवा हेही याचे एक कारण ठरू शकेल का? वैद्यकीय उपचार महागडे होत आहेत. परिणामी खासगी उपचार करून घेणे अनेकांसाठी आवाक्याबाहेरचे असते. त्यांना सार्वजनिक आरोग्यसेवेचाच आधार असतो. तथापि सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील सामान्य माणसांचा विश्वास उडावा अशा घटना अधूनमधून उघडकीस येतात.

रुग्णांच्या गर्दीने ओसंडणारी सरकारी रुग्णालये, त्याच्या तुलनेत कमी असणारी डॉक्टरांची संख्या, तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागा, नादुरूस्त यंत्रणा आणि कर्मचार्‍यांची काम करण्याची मानसिकता या उणिवांचे परिणाम सामान्य रुग्णांना भोगावे लागू शकतात. कदाचित त्यामुळेदेखील माणसे घरगुती उपचारांसाठी समाज माध्यमांचा आधार घेत असू शकतील का? त्यामुळे लोकांना विज्ञाननिष्ठ वैद्यकीय उपचारांकडे वळवायचे असेल तर सरकारी आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल.

अर्थात हे वास्तव असले तरी समाज माध्यमांवरील सल्ले माणसांनी कोणताही विचार आणि लेखनकर्त्यांची शहानिशा न करता अमलात आणू नयेत हेच खरे. कोणतेही वैद्यकीय उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करूच नयेत हा साधा विवेक आहे. जो राखण्यास सरीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यातील मतितार्थ लोक लक्षात घेतील का?

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...