Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १५ जुलै २०२४ - आरोग्याकडे दुर्लक्ष नको

संपादकीय : १५ जुलै २०२४ – आरोग्याकडे दुर्लक्ष नको

आषाढात श्रावणसरींचा अनुभव येत आहे. मध्येच उन्हाची तिरीप पडते तर क्षणात पावसाची रिपरिप सुरु होते. ठिकठिकाणी अस्वच्छता आढळते. काही ठिकाणी चिखल झाला आहे. रस्त्याच्या कडेला आणि खड्ड्यांमध्ये पाणी साठत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे वातावरण साथीच्या रोगांना पूरक मानले जाते. राज्यात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक असून झिकाचे रुग्णही वाढत आहेत.

डेंग्यूला आळा घालण्याचा दृष्टीने नाशिक महानगरपालिकेतर्फे घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. तशी ती इतरत्रही सुरु असू शकेल. ही तपासणी प्रभावी कशी ठरेल याची दक्षता घेतली जायला हवी. घरोघरच्या, गच्चीवरच्या पाण्याच्या साठ्यांची थेट तपासणी करण्याची सावधानता घेतली जाईल अशी अपेक्षा. डेंग्यूला आळा घालण्यासाठी स्वच्छतेला पर्याय नाही. कारण डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात.

- Advertisement -

परिसर स्वच्छता हे सरकारचे कर्तव्य आणि लोकांची जबाबदारी आहे. लोकसहभागाशिवाय कोणत्याही साथीच्या रोगाला अटकाव करणे शक्य होऊ शकेल का? यावर्षीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिवसाची संकल्पना देखील तीच आहे. ‘डेंग्यू प्रतिबंध : सुरक्षित उद्याची आपली जबाबदारी’ त्याचा विसर लोकांना पडणे म्हणजेच रोगाचा फैलाव वेगाने होणे. कोरडा दिवस पाळणे, पाण्याची भांडी स्वच्छ ठेवणे, परिसरात जुन्या टायरमध्ये, घरात ठेवलेल्या कुंड्यांमध्ये किंवा त्या ठेवलेल्या डिशमध्ये, कुलरमध्ये किंवा फ्रिजच्या मागच्या ट्रेमध्ये पाणी साठणार नाही एवढी काळजी तर लोक नक्की घेऊ शकतात. नव्हे त्यांनी ती घ्यायलाच हवी.

रस्त्यावर साठलेल्या पाण्यात पाय घालणे लोकांनी टाळावे. याच काळात सामान्य लोकांना सरकारी आरोग्य व्यवस्थेचा आधार वाटणे स्वाभाविकच. ती व्यवस्था सक्षम राखण्याला सरकारने प्राधान्य द्यायला हवे. पण आरोग्य विभागात सुमारे वीस हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. त्यात आरोग्य संचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांसह अनेक पदांचा समावेश आहे. तसे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. उपचारास साहाय्यभूत ठरणारी यंत्रणा अनेक ठिकाणी नादुरुस्त असल्याचे वृत्त माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होते.

करोना काळात ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये यंत्रसामग्री दिली गेली होती. कोल्हापूरमधील लाखोंचे साहित्य गंजून चालल्याचे वृत्त माध्यमात नुकतेच प्रसिद्ध झाले. इतरत्रही तशीच परिस्थिती नसेल कशावरून? राजकारण म्हटले की राजकीय खोखो, कुरघोडी, सत्तेचे गणित जुळवण्याचे प्रयत्न आलेच. तथापि त्या गदारोळात सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये इतकीच लोकांची अपेक्षा आहे. सरकारी आरोग्य व्यवस्थाच सक्षम नसली तर लोकांनी जायचे कुठे?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या