Friday, November 15, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १५ ऑक्टोबर २०२४ - मन करा रे प्रसन्न…

संपादकीय : १५ ऑक्टोबर २०२४ – मन करा रे प्रसन्न…

जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ सर्वत्र नुकताच साजरा झाला. अनेकदा शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक अस्वस्थता यांचा जवळचा संबंध असतो. त्याची जाणीव मोजक्या लोकांना का होईना पण होऊ लागली आहे. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी नात्यांत परस्पर संवादाची नितांत आवश्यकता असल्याचे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी एका कार्यक्रमात सांगितले. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी संवाद अनमोल आहेच. नातेसंबंधांचा तो भक्कम पाया आहे.

परस्पर संवाद वातावरण मोकळे आणि सकारात्मक होण्यास मदत करू शकतो. संवादातून माणसे कुटुंबातील सदस्यांकडे मन मोकळे करू शकतात. समस्या नेमकेपणाने मांडू शकतात. मात्र, त्यासाठी कोणीतरी एकाने पुढाकार घेणे गरजेचे असते. संवाद टिकवून ठेवण्यासाठी प्रसंगी माघार घेणे, तडजोड करणे, समोरच्या व्यक्तीला समजून घेणे किंवा समजावून सांगणे असे प्रयत्न आवश्यक असतात. निदान कुटुंबातील सदस्यांची तशी मानसिक तयारी असायला हवी तरच संवादाचा पूल उभा राहू शकतो. कुटुंबातील सदस्यांना तो आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळ्याच्या धाग्यांनी बांधून ठेवू शकतो. साहचर्य निर्माण करू शकतो. प्रसंगी एक पाऊल पुढे टाकण्याची किंवा मागे घेण्याची तयारी किती सदस्य दाखवतात यावरच संवादाचे आणि म्हणजेच मानसिक आरोग्याचे भवितव्य अवलंबून असते. डॉ. नाडकर्णी तेच सुचवू इच्छित असावेत.

- Advertisement -

मानसिक आरोग्य बिघडू शकते आणि माणसे मनाने आजारी पडू शकतात याचा स्वीकार माणसे करू शकतात का? हा महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा काही जण ती अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. तथापि ‘सगळे काही व्यवस्थित सुरु आहे, भरल्या घरात कसला आला आहे प्रश्न? नसते लाड दुसरे काय?’ अशीच संभावना होताना दिसते. मानसिक आरोग्यावर जनजागृती करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरु आहेत. निराशा, अतिचंचलता, क्रोध, अस्वस्थता, भावनिक चढ-उतार यावर मोकळेपणाने काही माणसे व्यक्त होतात. त्यात प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे.

तथापि सर्वसामान्य माणसांच्या पातळीवर त्याचा स्वीकार क्वचितच का होत असेल? विविध कारणांमुळे सामान्य माणसेही मानसिकदृष्ट्या आजारी पडू शकतात. हे वास्तव मान्य होत नाही तोपर्यंत त्यावर उपाय योजणे आणि ते अंमलात आणणे ही फार दूरची गोष्ट ठरेल. त्यासाठी प्रयत्न सुरु राहणे आवश्यक आहे. मन सुदृढ होण्यासाठी त्याला प्रसन्न ठेवायला हवे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या