Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १६ जुलै २०२४- लोका सांगे ब्रह्मज्ञान…

संपादकीय : १६ जुलै २०२४- लोका सांगे ब्रह्मज्ञान…

राजकारणी नेतेमंडळी म्हणतात जातीपाती मानू नका. सामान्य माणसे म्हणतात, जातीभेद सोडून द्या. सामाजिक संघटनाही तेच सांगतात. जातीपाती सर्वांनाच नको असतील तर त्या पाहिजेत असतात तरी कोणाला? हे म्हणजे संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट सांगितली जाते. त्या गोष्टीतील पाटलासारखे झाले म्हणायचे का?

तुकाराम महाराज पाटलांना वारीला चला असा आग्रह करतात. पाटील म्हणतात, प्रपंच सुटत नाही हो बुवा. दुसर्‍या दिवशी पाटीलबुवा गावच्या फेरीत निघतात तेव्हा त्यांना तुकाराम महाराज एका झाडाला विळखा घालून उभे असलेले दिसतात. पाटील म्हणतो, चला तुकोबा, गावाची फेरी मारू. तुकोबा म्हणतात, काय करू? हे झाड सोडतच नाही. पाटील हसतात आणि म्हणतात, तुकोबा तुम्हीच झाड पकडून ठेवले आहे. ते कसे सोडेन तुम्हाला? तुम्हीच सोडा त्याला.

- Advertisement -

तुकाराम महाराज पाटलाला म्हणतात, तुम्हीही प्रपंच पकडूनच ठेवला आहे. तुम्हीच तो सोडायला हवा. जातीपातींवरून सर्वांचाच पाटीलबुवा झाला असावा का? स्वार्थासाठी सगळेच जाती धरून ठेवत असावेत का? सर्व संतांनी तरी वेगळे काय सांगितले? संतू म्हणे जाती दोनच त्या आहे..स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे.. असे संत जगनाडे महाराज म्हणतात.

सिंह जंगलात एकटाच असतो. त्याचे कळप नसतात. हंसांचे थवे आणि रत्नांची पोती नसतात. तसेच, संत सुद्धा जातीजमाती घेऊन चालत नाहीत हा संत कबीर यांच्या एका दोह्याचा भावार्थ. जो जातीपातीवर बात करेन..त्याच्या मी लाथ मारेन असे एका मंत्र्यांनी नुकतेच म्हटले आहे. चावडीवर किंवा पारावरच्या गप्पांमध्ये माणसे बेंबीच्या देठापासून जातींचा निषेध करतात.

जातीपातींचा समाचार घेणारी भाषणे ऐकायला माणसे गर्दी करतात. पण प्रत्यक्षात मात्र, ‘पालथ्या घड्यावर पाणी’असाच अनुभव समाज घेतो. जातीपाती मनामनात खोलवर रुजवण्यात राजकीय पक्ष आघाडीवर असतात आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सगळेच पक्ष पडद्यामागे जातीचीच गणिते मांडतात हे कोणी तरी नाकारू शकेल? भाषणापुरता सर्वांचाच आवेश समजण्यासारखा असू शकेल. पण प्रत्यक्षात किती राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जातींवर लाथ मारू शकतील?

जे नेत्यांच्या मनात तेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आचरणात असा हा जातींचा सगळा जांगडगुत्ता आहे. मलोका सांगे ब्रम्हज्ञान असा सर्वांचाच आविर्भाव असेल तर मग कोणाच्याही हाताशी काय लागू शकेल? ‘बोले तैसा चाले..’हा संतोपदेश अंगी बाणवला तरच थोडाफार बदल शक्य होऊ शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या