देशातील जनतेला साखर आणि तेलाच्या सेवनाचे योग्य प्रमाण सांगायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. समोसा, वडापाव, भजी, लाडू, जिलेबी आदींसह सर्व तर्हेच्या चटपटीत जंकफूडचा आस्वाद घेणार्या खवय्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.आरोग्याला घटक असूनही जंकफूडची चटक लोकांना लागली आहे. केवळ बाहेरचे खाद्यपदार्थच नव्हे तर कोणतीही गोष्ट अती झाली की, त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच भारतातील प्राचीन वैद्यकीय उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात आहार आणि विहारावर सखोल विचार केल्याचे दिसून येते.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच ठरतो. सर्वांना ते चांगले ठाऊक आहे, पण खवय्येगिरीपुढे त्याचा विसर बहुतेकांना पडत चालला असावा. त्यामुळेच असे खाणे-पिणे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि प्रसंगी कर्करोगासारख्या दीर्घकालीन व्याधींचे प्रमुख कारण ठरत आहे. अशा पदार्थांच्या अतिसेवनाने प्रमाणापेक्षा जास्त तेल आणि साखर पोटात जाते. त्यामुळे चरबीचे प्रमाण वाढत जाते. खाद्यतेलाचा टाळण्यासाठी पुनर्वापर आहारशास्त्र निषिद्धच मानते. काही दशकांपूर्वी पन्नाशीनंतर आढळणारे अनेक आजार माणसांना आजकाल तरुण वयातच ग्रासत आहेत. त्या धोयांबाबत वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार लक्ष वेधून घेतात. तरीही म्हणावी तितकी जागरूकता समाजात अजूनही आलेली नाही. त्यात आता केंद्र सरकारच्या नव्या इशार्याची भर पडली आहे.
तेलकट-गोड पदार्थांच्या सेवनाने होणार्या संभाव्य परिणामांबाबत धोयाचा इशारा देणारे फलक सध्या केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांतील उपाहारगृहांत लावले जातील. पुढे तसे फलक लावण्याची सक्ती कदाचित सर्वत्र केली जाईल. यामागे सरकारचा हेतू जनहिताचा वाटत असला तरी पुढे जाऊन फलक न लावणार्या उपाहारगृहांवर कारवाईचा दंडुका सरकारी बाबूलोक उगारतील. त्यातून मखाण्याचाफ नवा मार्ग शोधला जाणार तर नाही ना? तेलकट आणि गोड पदार्थांच्या सेवनातून होणार्या संभाव्य परिणामांबाबत नुसता इशारा देऊन भागणार नाही; तर त्याबाबत जागरूकताही वाढवावी लागेल, पण शेवटी आरोग्याची काळजी घेणे ही ज्याची-त्याची व्यक्तिगत जबाबदारी आहे.
कारण व्याधींचे परिणाम आरोग्याकडे दुर्लक्ष करणार्यालाच भोगावे लागतात. एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या दीर्घकालीन व्याधीने त्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटते. महागडी उपचारपद्धती लोकांच्या बचतीवर घाला घालते. डॉटर इशारे देतील. सरकारकडून जनजागृतीसाठी फलकबाजी केली जाईल. गोरगरिबांना मोफत उपचार सुविधाही पुरवली जाईल, पण व्याधी झाल्यावर उपचारांसाठी धावाधाव करण्यापेक्षा ती होऊच न देणे यातच खरे शहाणपण आहे.




