महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या यशाचा आनंद आहे. पण त्यांच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांच्या यशाला अपार जिद्दीची आणि निर्धाराची किनार आहे.
घरातील सर्व कामे करणारी श्रद्धा, भाजीपाला विक्रेत्याची मुलगी सोनल, आदिवासी पाड्यावर पत्र्याच्या छोट्याशा शेडमध्ये राहणारी वर्षा, बांधकाम मजुराचा मुलगा कैफ रजा नसीम, नाश्ता केंद्रावर आईला मदत करणारा यश अशी कितीतरी नावे आहेत, ज्यांच्या यशोगाथा माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील एक जफर अन्सारी दुकानावर काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. आर्य योगेश ठोकेला स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी ही दुर्धर व्याधी जडली आहे. त्या वेदना सहन करून त्याने परीक्षा दिली.
या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले हा मुद्दाच गौण आहे. त्यांनी प्रतिकूलतेचा केलेला सामना जास्त प्रेरणादायी आहे. ही मुले जेमतेम सोळा-सतरा वर्षांची आहेत. हे वय अडनिडे मानले जाते. वयाचा हा टप्पा त्यांच्यात अनेक बदल घडवणारा आणि म्हणूनच अनेक प्रश्न निर्माण करणारा मानला जातो. तथापि त्याच वयाच्या टप्प्यावर उपरोक्त उल्लेखिलेल्या आणि त्यांच्यासारख्याच सर्व विद्यार्थ्यांनी सामंजसपणाचे आणि परिपक्वतेचे दर्शन समाजाला घडवले. समाजात अनेकांना त्यांनी ठरवलेले ध्येय साध्य करणे शक्य होत नाही. तथापि त्याचा दोष परिस्थितीला आणि अभावाला दिला जातो. माणसे परिस्थितीला शरण जातात. काहीच करू शकत नाही अशी हतबलता स्वीकारतात.
परिणामी निष्क्रिय बनतात. तसे उपरोक्त उल्लेखिलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले नाही. मुलांनी परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक वातावरणाचा अभाव, आर्थिक अस्थिरता, उदरनिर्वाहासाठी कष्ट करणारे पालक अशीच त्यापैकी बहुसंख्यांची परिस्थिती होती. पालक घेत असलेल्या कष्टांची जाणीव होती. परिणामी या मुलांनी त्यांची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर घेतली होती. स्वतःच अभ्यास केला होता. त्यामुळे परीक्षेतील यशप्राप्तीचा त्यांचा आनंद कोणतेही शिखर गाठल्यानंतर होणार्या आनंदासारखाच ठरावा. ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती’हेच खरे.
दहावीच्या निकालात प्रचंड संख्येने यश मिळवलेल्या मुलीही याच कौतुकास पात्र आहेत. मुले आणि मुलींमध्ये भेद करून नये हे खरे. पण समाजाच्या चौकटीत मुलींना मुलांपेक्षा अंमळ वेगळेच वाढवले जाते हेही खरेच. घरकामात मदत व भावंडांचा सांभाळ त्यांनी करावा या बहुसंख्य मुलींकडून सामान्य अपेक्षा असतात. त्या मुलींना मुलांपेक्षा वेगळे ठरवतात. त्यामुळेच मुलींनी मिळवलेल्या यशाची वेगळी चर्चा झडते. तेव्हा या चिकाटी, एकाग्रता आणि जिद्दीच्या बळावर यश मिळवलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.