Wednesday, January 7, 2026
Homeअग्रलेखसंपादकीय : १७ जानेवारी २०२५ - नात्यांच्या गोतावळ्याचे प्रेरणादायी उदाहरण

संपादकीय : १७ जानेवारी २०२५ – नात्यांच्या गोतावळ्याचे प्रेरणादायी उदाहरण

मकरसंक्रांतीचा सण सर्वांनी नुकताच उत्साहात साजरा केला. तीळगूळ देऊन परस्पर संवादातील गोडवा जपण्याचा संदेश एकमेकांना दिला. नात्यांमधील तोच गोडवा आणि जिव्हाळा वाढवण्याचे काम शैलेश आणि वर्षा टूकरल करतात. कवयित्री विमल लिमये यांची एक कविता आहे. ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती’. ते दोघेही अंध असले तरी डोळसपणे शब्दशः ती कविता जगतात. त्यांना ‘देशदूत’ ने नुकतेच बोलते केले.

तेव्हा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. शैलेश यांचे किराणा दुकान होते. त्यांच्या वडिलांना गंभीर आजार झाला. तेव्हा, क्षमतेनुसार वडिलांचे उपचार करायलाच पाहिजेत हाच विचार त्यांनी केला. किराणा दुकान विकले आणि वडिलांवर उपचार केले. तसे करतांना अंध असल्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही, असे त्यांनी ‘देशदूत संवाद कट्ट्यात’ बोलताना सांगितले.

- Advertisement -

आपसातील नाती प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी, अंत:करणातील ओलावा याने बांधलेली असतात. काय हवे असते माणसांना त्या गोतावळ्यातून? ओवी सुनील उंबरकर ही चिमुकली याचे उत्तर देतांना तिच्या कवितेत म्हणते, ‘नाती म्हणजे असे बंधन, जिथे असते प्रेमाची गुंफण !’ या बंधनातून काय हवं, हवा मला विश्वास कौतुकाची थाप आणि अस्तित्वाचा ध्यास जो दुर्मिळ होत चालला असावा का? वास्तविक माणुसकी, सहवेदना, संवेदना ही मूल्ये माणसाचे अंगभूत वैशिष्ट्य. ज्यामुळे माणसे एकमेकांच्या जवळ येतात.

YouTube video player

रक्ताचे नाते नसले तरी मैत्रीच्या नात्यात बांधले जातात. त्यात कोणताही व्यवहार अनेकांना अपेक्षित नसतो. हे टूकरल यांनी त्यांच्या कृतीतून दाखवले आहे. दृष्टी नसतानांही किंचितही स्वार्थ त्यांच्या मनाला शिवला नाही. बिनशर्त प्रेम यालाच म्हणत असावेत. बिनशर्त प्रेम करणे परिस्थिती, आर्थिकता, शारीरिक क्षमता यावर अवलंबून नसते. असे प्रेम माणसांनी माणसांवर करण्याची नितांत गरज सध्या भासते. मुले त्यांच्या पालकांना सोडून देतात. कारणे काही असू शकतील तरीही ते कृत्य समर्थनीय नाहीच.

कुटुंबसंस्था अस्वस्थ आहे. तिच्याशी संबंधित दावे आणि घटस्फोट वाढत आहेत. कौटुंबिक संवाद हरवत चालल्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. प्रसंगी न सांगता एकमेकांच्या मदतीला धावणे माणसे विसरत चालली असावीत असेच वातावरण आहे. पण अशा परिस्थितीतही टूकरल दाम्पत्य त्यांचा मानवधर्म विसरले नाही. ते प्रेरणदादायी आहे. माणसाने, माणसाशी, माणसासम बिनशर्त वागणे हाही सामाजिक आणि कौटुंबिक अस्वस्थतेवरचा एक महत्वाचा उपाय आहे हेच खरे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....