Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : १७ जुलै २०२४ - माऊली माऊली

संपादकीय : १७ जुलै २०२४ – माऊली माऊली

आज आषाढी एकादशी. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा मळा फुलला आहे. वारकरी त्यांचा सगळा शिणभाग विसरून भक्तीच्या रंगात रंगले आहेत. आज ते सगळे विठ्ठलचरणी लीन होतील आणि विठ्ठलाचे गारुड घेऊनच परततील. लाखो वारकरी मैलोन्मैल का चालतात, हा आजही अनेकांच्या आश्चर्याचा विषय आहे.

हा तर आनंदाचा..मानवतेचा, माणसाने, माणसाशी, माणसासम वागण्याचा, सृष्टिकर्त्या आणि करवित्याच्या कृतज्ञतेचा सोहळा. वारकरीही माऊली माउली म्हणत एकमेकांच्या उराउरी भेटत आहेत. त्यामागची भावनाही ‘मंदिरात अंतरात तोच नांदत आहे..नानारुपी नाना देही तुझा देव आहे..’ हीच भावना असेल. पंढरपुरी आज सर्व संतांचा जयघोष सुरु आहे. प्रत्यक्ष विठ्ठल देखील स्वतःला संतांचा भक्त मानतो म्हणे. म्हणूनच तो दळण कांडतो..पाणी भरतो..कपडे धुतो..मडकी घडवतो..घरची सगळी कामे करतो. ते संतही मानवतेचाच पुरस्कार करतात.

- Advertisement -

माणसाने संयम शिकावा. सहनशील बनावे. माणूस म्हणून एकमेकांशी वागावे. आदर करावा. सत्याची चाड ठेवावी. सकारात्मकता अंगी बाणवावी. आपपरभाव ठेवू नये. समदृष्टी अंगीकारावी. वृत्ती विनयशील असावी हाच उपदेश सगळे संत करतात. त्यांचे आचरण अवघड नाही याचा स्वकृतीतून आदर्श उभा करतात. संतांच्या नुसत्या दर्शनानानेही माणसाचे मन आनंदाचे भरून जाते ते यामुळेच. मानवतेच्या सर्व गुणांचा समुच्चय संतांच्या ठायी अनुभवास येतो. तीच तर मानवाची वैशिष्ट्ये आहेत.

जी माणसाला प्राणिजगतापासून वेगळे करतात. वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. पण माणसांची अवस्था मात्र ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ अशी का झाली असावी? संपन्न वारशाचा, संस्कृतीचा, सहिष्णुतेचा माणसांना विसर का पडत असावा? सद्गुण अंगीकारणे दुष्कर का वाटत असावे? त्याची आठवण संतच सातत्याने करून देतात. ‘हृदयातील भगवंत राहिला.. हृदयातून उपाशी’ असा उपदेश करतात. जवळी असता जगज्जीवन । का धांडोळीसी वन.. असा प्रश्न संत ज्ञानेश्वर महाराज विचारात तर देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निर्दैव असे संत तुकाराम महाराज म्हणतात.

ते सगळे माणसांना त्यांच्या आतल्या परमेश्वराची भक्ती करायला सुचवतात. ज्याची समाजाला कधी नव्हे इतकी गरज आहे. वातावरण कलुषित आहे. माणसे एकमेकांना माणसे मानेनाशी होत आहेत. अहंकार आणि गर्व हीच जणू माणसाची ओळख बनत आहे. जी सामाजिक हिताची नाही. देव कोणी वेगळा आहे हा माणसांचा भ्रम आहे, तो प्रत्येकातच वसलेला आहे. सद्गुणांची आराधना करण्यातच समाजाचे हित दडलेले आहे असेच जणू संतांना सुचवायचे असावे. ज्यातील मर्म माणसांनी समजावून घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या