Thursday, October 17, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १७ ऑक्टोबर २०२४ - पुन:पुन्हा असे का घडते?

संपादकीय : १७ ऑक्टोबर २०२४ – पुन:पुन्हा असे का घडते?

मोह न आवरता आल्यामुळे काही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. काही मुले नागपूर रामटेकच्या पेंच नदी परिसरात फिरायला गेली होती. पोहोण्याच्या नादात आठ मुले पाण्यात उतरली. खोलीचा अंदाज न आल्याने चार जणांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया सावरी-लोधीटोला परिसरात दुर्गामूर्ती विसर्जनावेळी तीन मुले बुडून मरण पावली. त्यांनाही पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नव्हता, असे प्रसिद्ध बातमीत म्हटले आहे.

गणेश विसर्जनाप्रसंगी अशाच काही घटना घडल्या होत्या. पर्यटनस्थळी बुडण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. माणसांचा हा वेडाचार फक्त एवढ्यापुरता मर्यादित नाही. निसर्गाला गृहीत धरून धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा रिल बनवण्याच्या नादात अनेक जण जीव गमावतात. यंदाच्या पावसाळ्यात अशा अनेक ठिकाणांवर सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. जलाशय, धरणे किंवा धबधब्याच्या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारे सूचना फलक लावले जातात. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, पालिका अथवा महापालिका जीवरक्षक नेमतात. तरीही अशा घटना का घडतात? नियमांना बगल देण्याची किंवा हरताळ फसण्याची आणि स्वतःसह समाजालाच गृहीत धरण्याची वृत्ती वाढत आहे.

- Advertisement -

‘काही होत नाही’ हा भ्रमही वाढत आहे. त्यामुळे क्षणिक मोह सद्सद्विवेकबुद्धी आणि तर्कसंगत विचारांवर मात करत असेल का? त्यामुळे माणसे जीवघेणे धाडस करायला प्रवृत्त होत असतील का? जीवावर उदार होण्याला अनेक युवा मर्दुमकी समजत आहेत. दुर्दैवाने समाज माध्यमांवर अशा प्रकारांना उचलून धरले जात आहे. प्रसिद्धी मिळत आहे. परिणामी अतिरेकी हिंमत करणारे बेपर्वा युवक युवा पिढीचे हिरो बनल्याचे दिसते. ‘पुढच्याच ठेच, मागचा शहाणा’ हा सुविचार सांगण्यापुरताच उरतो.

अनाठायी धाडस अनेकांच्या जीवावर बेतते. यावर तज्ज्ञ अनेक उपाय सुचवतात. सामाजिक वर्तनाचा विवेक राखणे, स्वयंशिस्त पाळणे, अकारण धाडसाचा मोह टाळणे हे त्यापैकी काही उपाय! या मुद्यांना धरून युवकांशी सतत संपर्क साधणेही तितकेच गरजेचे आहे. नियमांचा आदर करण्याची वृत्ती तरुणाईत रुजणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात पालकांना स्वतःपासून करावी लागेल. पालकांनी आदर्श उभा केला तर मुले त्याचे अनुकरण करतील. आपोआपच कायद्याचा-सरकारी बंदीचा आदर त्यांच्याकडून होऊ लागेल. तसे झाल्यास अशा अनिष्ट घटनांना निदान काही प्रमाणात तरी पायबंद बसू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या