जगाने त्यांना उस्ताद मानले होते. मानाच्या असंख्य पुरस्कारांनी नावाजले होते. वयाच्या सातव्या वर्षी ज्यांनी पहिला कार्यक्रम केला. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. संगीतातील अनेक दिगज्ज कलाकारांना साथ केली. भारतातील कलाकारांना जगाचे आकाश खुले करून दिले. रसिकांनी गळ्यातील ताईत बनवले होते असे झाकीरभाई स्वतःला अखेरपर्यंत शागीर्द समजत राहिले.
‘बेटा स्वतःला शागीर्द मान. उस्ताद बनण्याचा प्रयत्न करू नकोस. चांगला शागीर्द आयुष्यभर विद्यार्थी राहातो’ असा संस्कार माझ्या वडिलांनी माझ्यावर केला होता. नम्रतेचा आणि शिष्यत्वाचा वारसा पित्याने आपल्याला दिला असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. तालीमही तशीच दिली होती. त्यांचे वडील उस्ताद अल्लारक्खा कुरैशी यांचे ऋजू आणि प्रेमळ व्यक्तिमत्व अनेकांना आजही आठवत असेल. हाच वारसा मागे सोडून झाकीरजी अंतिम प्रवासाला निघून गेले आहेत. त्यांचा वारसा त्यांना अजरामर करून गेला आहे. तबला हे साथ वाद्य.
तबलावादनाला त्यांनी स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिले. स्वतःचेही प्रभावी स्थान निर्माण केले. पण मैफिलीत साथ करतांना कधीही इतर कलाकारांवर कुरघोडी केली नाही. श्रोत्यांना खिळवून ठेवण्यासाठी अधूनमधून गमतीजमती करत पण त्या तेवढ्यापुरत्याच असत. सामान्य माणसे सामान्यतः शास्त्रीय संगीत मैफिलीच्या वाटे फारसे जात नाहीत. कारण त्यातले फारसे काही कळत नाही अशी लोकांची प्रामाणिक भावना असते. तथापि झाकीरभाईंचे तबलावादन ऐकण्यासाठी हीच माणसे गर्दी करत. भरभरून दाद देत. त्यासाठी तबल्यातील काही कळण्याची गरज लोकांना वाटली नाही.
इतके तबलावादन त्यांनी नावारूपाला आणले होते. घराघरात नेले होते. परिणामी मुलांनी तबला शिकावा अशी भावना असंख्य पालकांच्या मनात निर्माण झाली. मुलांना तबला शिकण्याची वाट त्यांनी खुली केली. त्यानिमित्ताने घराघरात ते सर्वांना त्यांचेच वाटत राहिले. झाकीरभाईंमुळे असंख्य तबलावादक त्यांची जागा निर्माण करू शकले. सामान्य माणसांशी जोडली गेलेली त्यांची नाळ कोणताही पुरस्कार कधीही तोडू शकला नाही.
झाकीरभाईंनी तसे होऊ दिले नाही. त्यांना भेटलेल्या, त्यांना पाहिलेल्या प्रत्येक माणसाच्या ते कायम आठवणीत राहिले. यापुढेही राहातीलच. कारण त्यांनी संगीतक्षेत्रात, रसिकांच्या मनात त्यांची एक जागा निर्माण केली आहे. झाकीरभाईंच्या जाण्याने लाखो मनामनातील तबल्याचे बोल शांत झाले आहेत. असा कलाकार पुन्हा होणे नाही.