Monday, November 18, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १८ नोव्हेंबर २०२४ - जीवावर बेतणारा अट्टहास

संपादकीय : १८ नोव्हेंबर २०२४ – जीवावर बेतणारा अट्टहास

प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण वेगाने वाहने हाकण्याचा, नियम मोडण्याचा आणि एकमेकांना ओलांडून पुढे जाण्याचा अट्टहास पूर्णच करू, असे बहुसंख्य वाहनचालकांनी ठरवले असावे. त्याशिवाय रस्ते अपघातांची संख्या कशी वाढू शकेल? जी दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्तर प्रदेश बिजनोर येथे नुकताच एक भीषण अपघात घडला. वाहन ओलांडून (ओव्हरटेक) जाण्याच्या नादात झालेल्या अपघातात सात लोकांचा हकनाक बळी गेला. अशा कितीतरी घटना रोज घडतात.

2014 ते 2023 या 10 वर्षात रस्ते अपघातात सुमारे 15 लाख लोकांचा मृत्यू झाला. रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. रस्ते अपघातातील एकूण बळींमध्ये युवांची संख्या जास्त असल्याचे सांगितले जाते. या खात्याचे केंद्रीय मंत्री देखील अनेकदा जाहीर चिंता व्यक्त करतात. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये राज्यात अपघातांची संख्या वाढली असल्याचे त्यात नमूद आहे.

- Advertisement -

अती वेगाने आणि बेपर्वाईने वाहने चालवणे, नियमांचे पालन न करणे, मद्य पिऊन वाहन चालवणे आणि पादचारी रस्ता ओलांडत असताना न थांबणे ही त्याची काही काही कारणे सांगितली जातात. म्हणजे या चुकांमुळे झालेल्या अपघातांची जबाबदारी माणसांचीच म्हटली जाऊ शकेल का? रस्तोरस्तींच्या वेगमर्यादा, नियम यांचे सूचनाफलक लावलेले आढळतात. तथापि त्याकडे वाहनचालक सर्रास दुर्लक्ष करत असतात हे नव्याने सांगायला नको. ते नियम पाळण्याची जबाबदारी चालकांची असते.

नियमांचा आदर करून सर्वांचाच जीव सुरक्षित ठेवण्याला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. तथापि तसे क्वचितच घडते. वेगाची नशा वाहनचालकांना मृत्यूच्या खाईकडे नेते हे आकडेवारीवरून लक्षात यावे. महामार्ग असोत अथवा गल्लीबोळातील रस्ते, वाहनांचा वेग कमी होत नाही. उलट त्याचे आकर्षण वाढते. अमूक किलोमीटरचे अंतर किती मिनिटात किंवा तासात कापले हेच गौरवान्वित केले जाते. असा तथाकथित पराक्रम करणार्‍या युवांना त्यांची पिढी हिरो मानते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वेगाने वाहने हाकणार्‍यांची संख्या वाढतच जाते. तसतसे अपघात घडण्याचा संभवही वाढणे स्वाभाविकच. मद्य पिऊन गाडी चालवणार्‍यांच्या बाबतीतही हेच घडते.

रात्रीच्या वेळी मद्य पिऊन गाड्या हाकतात आणि अपघातांचे कारण ठरतात. याला अटकाव करण्यासाठी अनेक कायदे आहेत. त्यांचे नियम आहेत. ते मोडणार्‍याला जबर दंड व शिक्षेची तरतूद देखील आहे. पण त्याची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे अनुभवास येत नाही. मग त्यातही भिडभाड वाहनचालकही ठेवत नाहीत असा हा सगळा गुंता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या