बिहार विधानसभा निवडणुकीत उडालेल्या फज्जाची कारणे काँग्रेस पुन्हा एकदा निवडणुकीतील अनियमिततेत आणि हेरा़फेरीत शोधणार आहे. निवडणूक निकालाचा आढावा घेणार्या बैठकीत भाजपवर उपरोक्त आरोप केले गेले. पक्ष या अनियमिततेचे पुरावे गोळा करणार आहे. दोन आठवड्यानंतर ते देशासमोर मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. पक्ष नेते राहुल गांधी देखील या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस हा पक्ष नाही तर दीडशे वर्षांची परंपरा असलेली विचारधारा आहे असे आजही असंख्य लोक मानतात. महाराष्ट्र विधानसभेत मिळालेल्या ४४ जागा हे त्याचे चपखल उदाहरण ठरू शकेल. त्याही निवडणुकीत अखेरपर्यंत राजकारण सुरू होते. प्रचारासाठी कोणतेही विशेष परिश्रम न घेतले गेल्याची टीका झाली होती.
काँग्रेस पक्ष संपला असेही बोलले गेले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या जागांचा आकडा अनेकांसाठी धक्कादायक ठरला होता. काँग्रेस पक्षाची पाळेमुळे आजही खोलवर रुजली आहेत याचे ते द्योतक मानले गेले. असा पक्ष अपवाद वगळता देशाच्या कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत प्रभाव का टाकू शकत नाही यावर खरे तर चिंतन अपेक्षित आहे. मतचोरी आणि निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप काँग्रेसने याआधीही सोदाहरण केला आहे. लोकांवर तो प्रभाव टाकू शकेल का याची चाचणी म्हणून बिहार निवडणुकीकडे पाहिले तर निराशा हाती लागते. तरीही पुन्हा तोच आरोप त्याच पद्धतीने करून हाती काय लागू शकेल? तो मुद्दा लोकांना कसा पटवून द्यायचा याचा विचार अधिक विस्ताराने होणे पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अपेक्षित असेल. निदान या पराभवाची मीमांसा राजकीय विश्लेषकांनी कशी केली याची तरी दखल घेतली गेली का? निवडणूक फक्त आरोपांवर लढली जात नाही.
पक्षाचा सामाजिक पाया, पक्षाचे मजबूत संघटन, नेत्यांचे संघटन कौशल्य, मतदारांची नाड़ी, मतदारसंघातील समीकरणांचा (खरे तर जातीय बलाबलाचा) अंदाज, युती असेल तर जागा वाटपात आणि उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी असे अनेक मुद्दे निवडणुकीतील विजयाचा रस्ता सुकर करतात असे तज्ज्ञ सांगतात. भारतातील कोणतीही निवडणूक भावनिक मुद्यांवर जास्त लढवली जाते असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर चित्र काय आहे? याचे प्रामाणिक आत्मचिंतन वरिष्ठांनी करावे असे कार्यकर्त्यांना वाटते. पण ते तसे केले जात नाही हेच वास्तव बिहार निवडणुकीतील पराभवाने आणि त्यानंतरच्या पक्षीय पातळीवरील आत्मचिंतनाने अधोरेखित केले. काँग्रेसने पुन्हा एकदा तेच आरोप केले. भारतीय जनता पक्ष सदोदित निवडणुकीच्या तयारीत असतो असे म्हटले जाते. एका निवडणुकीत विजय मिळवला की तो पक्ष त्याच ठिकाणच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागतो, असे म्हणतात.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून इतर पक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू आहे आणि भाजप त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करून मोकळा झाला आहे. हीच गती कायम राहिली तर ते उमेदवारी देखील जाहीर करू शकतील. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमुक्त भारताची जणू शपथ घेतल्याचे त्यांचेच नेते बोलून दाखवतात. पण लोकशाहीमध्ये प्रभावशाली विरोधी पक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विरोधी पक्ष जनहिताच्या उद्देशाने सरकारवर अंकुश ठेवतात. बहुमताच्या जोरावर निवडून आले असले तरी सरकार कर्तव्यदक्षपणे काम करते की नाही, सत्ता जनहितासाठी राबवली जाते की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करतात. ज्या संविधानाचा गजर नेते उठताबसता करतात त्याच संविधानाने काँग्रेस पक्षावर किती मोठी जबाबदारी सोपवली आहे हे नेते लक्षात घेतील का? उरफोड कष्टाने घेताही महाराष्ट्रात जर ४४ जागा निवडून येत असतील तर नियोजनपूर्वक निवडणूक लढवली तर हा पक्ष अजूनही चमत्कार घडवू शकतो असे मतदारदेखील मानतात.
त्यासाठी गरज आहे प्रामाणिक आत्मचिंतनाची आणि पक्षाचा सामना असलेल्या पक्षांच्या कार्यपद्धतीच्या अभ्यासाची. माईक टायसन या जगज्जेता बॉसर कोणत्याही सामन्यापूर्वी अनेक तास सराव करायचा. सराव करून दमला की थांबायचा. पण लगेच त्यांच्या मनात विचार यायचे की, माझा प्रतिस्पर्धी देखील आता सराव करून दमला असेल, तोही थांबला असेल. मला त्याच्यावर मात करायची असेल तर थांबून चालणार नाही आणि तो पुन्हा एकदा उठून सरावाला लागायचा, अशी गोष्ट सांगितली जाते. शत्रूवर मात करायची असेल तर तो कसा विचार करतो हे लक्षात घेतले पाहिजे असे म्हणतात. त्यातील मर्म काँग्रेसचे नेते लक्षात घेतील का?




