पद्मश्री तुलसी गौडा यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोण होत्या, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी लावलेले हजारो वृक्ष अनंत काळापर्यंत देत राहतील. उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या होन्नाळी गाव परिसरात राहणार्या त्यांना परिसर जंगल अम्मा नावाने ओळखायचा. वृक्षांच्या बाबतीत त्या चालताबोलता माहितीकोशच होत्या. झाडे लावण्याबरोबरच त्यांनी त्यांच्याकडचे ज्ञान पण वाटले. त्याअर्थाने तो परिसर आता पोरका झाला आहे. कारण तुलसी अम्मा आता त्यांच्यात नाहीत. पर्यावरण संतुलनात झाडांचे महत्त्व वेगळे सांगायला नको.
कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती कोसळली की वृक्षारोपणाचा गजर होतो. लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले जाते. कोणत्याही सामाजिक बदलाची चर्चा ‘मी एकट्याने करून काय होणार आहे’ या पालुपदावर येऊन संपते. कचरा फेकू नका, पाणी जपून वापरा, एक तरी झाड लावा आणि ते जगवा, नदीत कचरा टाकू नका असे सुचवले तर तीच सबब पुढे केली जाताना आढळते. केवळ तुलसी गौडाच नव्हे तर त्यांच्यासारख्या अनेकांनी या सबबीला प्रत्यक्ष कृतीतून अबोल उत्तर दिले आहे. त्यांनी स्वतःला पर्यावरणवादी म्हणून घेतले नाही, कामाचे ढोल पिटले नाहीत किंवा छायाचित्र प्रसिद्ध व्हावे म्हणून प्रयत्न केला नाही. शांतपणे त्यांचे काम करत राहिले.
कर्नाटक कोडूरच्या सालूमार्दा थिमक्का यांनी वयाची शंभरी पार केली आहे. वय त्यांना थांबवू शकलेले नाही. हजारो झाडे लावली आहेत. लावत आहेत. झाडांची आई हीच त्यांची ओळख आहे. दरीपल्ली रामय्या हे असेच एक नाव. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातील रहिवासी. लोक त्याला ‘चेटला रामय्या’ म्हणतात. तेलगू भाषेत चेट्टू म्हणजे झाड ‘झाडंवाला रामय्या’ यांनी किती झाडे लावली हे वेगळे सांगायला नको. आसामचे जादेव पायंग यांच्या अचाट कामाने त्यांना ‘वनपुरुष’ अशी ओळख मिळवून दिली. त्यांनी काहीशे एकरावर जंगल फुलवले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे यांना ‘बियाणांची माता’ असे संबोधले जाते. विविध पिकांच्या गावठी वाणांची त्यांनी बँक बनवली आहे. यांनी काहीही न बोलता काम सुरू केले. लोक साथ देतील का, काही म्हणतील का याची त्यांनी फिकीर केली नाही. एकट्याने झाडे लावून काय होणार आहे असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. कोणत्याही बदलाची सुरुवात घरापासून करावी, असे म्हटले जाते. त्याचे अनुकरण करून एक माणूस काय करू शकतो याचे उदाहरण समाजासमोर घालून दिले आहे. त्यांचे कार्य अनुकरणीय आहे. परिवर्तनाच्या विचाराने भारलेली एक व्यक्ती बदल घडवू शकते. लोकांना प्रेरणा देऊ शकते आणि डोंगराएवढे काम उभे करू शकते हेच खरे. ते काम करून त्यांनी मानवजातीवर असंख्य उपकार केले आहेत.