Thursday, July 4, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २० जून २०२४ - समाज माध्यमांच्या वापराबाबत कडेलोटाची वेळ?

संपादकीय : २० जून २०२४ – समाज माध्यमांच्या वापराबाबत कडेलोटाची वेळ?

कार अपघातांची वाढती संख्या कमी करण्यासाठी कायदे बदलले जातात. सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले जाते. मग समाज माध्यमांमुळे होणारी हानीही तितकीच गंभीर आहे. या माध्यमांमुळे मुलांचे मानसिक आरोग्य आपत्कालीन स्थितीत आहे. त्यापासून त्यांना वाचवण्यासाठी ‘वोर्निंग लेबल’ लावण्याची वेळ आली आहे, असे मत डॉ. विवेक मूर्ती यांनी नुकतेच व्यक्त केले.

- Advertisement -

डॉ. मूर्ती हे अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक आहेत. आरोग्य योजनांच्या बाबतीत या पदावरील व्यक्तीची स्वाक्षरी अंतिम असते. तेथील तिन्ही सेनादलांचे आरोग्य त्यांच्या निर्णयावर अवलंबून असते. मूर्ती यांनी दिलेल्या इशार्‍यातील गांभीर्य लक्षात घेण्यासाठी त्यांचा परिचय पुरेसा ठरावा. अर्थात असा इशारा देणारे मूर्ती हे पहिले नाहीत. तज्ज्ञ असा इशारा नेहमीच देतात. मानसोपचारतज्ज्ञांकडे समुपदेशन आणि इलाज करून घेण्यासाठी वाढती युवासंख्या या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देऊ शकेल.

समाज माध्यमांवरील लोकप्रियतेसाठी वेडेपणा करणारे अवतीभोवती अनेक जण आढळतात. प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण रिल बनवूच अशा अविर्भावामुळे अनेकांचे जीवही जातात. मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते. मुले डार्कवेबच्या जाळ्यात फसू शकतात. त्यांना निराशा-चंचलता-अस्वस्थता गाठू शकते. या माध्यमांवरील खेळही जीवघेणेचे आढळतात. तरीही त्याच्या वापरावर मर्यादा आणण्याचा विचार का केला जात नसावा? मागच्यास ठेच लागूनही पुढचा शहाणा मात्र व्हायला तयार नाही असेच बहुधा मूर्ती यांना सुचवायचे असावे.

मूर्ती यांनी काही उपायदेखील सुचवले आहेत. जसे की, अभ्यास, सामाजिक-कौटुंबिक संवाद-जेवण करणे आणि झोपणे यावेळेत तरी फोन नकोच. खरेतर असे अनेक उपाय लोकही जाणून असू शकतात, पण ‘मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी?’ हा खरा प्रश्न आहे. सुचवलेला उपायही अंतिम नाही पण तो पालकांना सावधान करू शकेल, असेही मूर्ती यांनी म्हटले आहे. म्हणजे मुलांनी बदलावे असे वाटत असेल तर त्याची सुरुवात पालकांना त्यांच्यापासून करावी लागेल. मुलांना मोबाईल आणि समाज माध्यमांची सवय लावण्यासाठी कळत-नकळत पालकच जबाबदार असतात.

मूल रडते…जेवत नाही..चिडचिड करते..त्रास देते यावर उपाय म्हणून बहुसंख्य पालकच त्यांच्या हातात मोबाईल सोपवतात. मुलांसमोर पालकच समाज माध्यमांवर तासन्तास व्यस्त असतात. मग मोबाईलपासून दूर राहा असे पालकांनी बजावले तरी मुले त्याची अंमलबजावणी कशी करतील? फोन व त्यावरील माध्यमे वापरण्यातील पारदर्शकता आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी न घेता तंत्रज्ञान आपलेसे करण्याबाबतदेखील मूर्ती यांनी काळजी व्यक्त केली.

तथापि मुलांना त्याचे दुष्परिणाम जाणवून देण्यासाठी ते पालकांना पूर्णपणे माहीत असायला हवेत. असे किती पालक असू शकतील? की याबाबतीतही, आमचे मूल तसे नाही असाच भ्रम जोपासत मोबाईलच्या वाढत्या वापराकडे दुर्लक्ष केले जात असावे? तसे होत असेल तर ते त्यांच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे ठरू शकेल. मुलांमध्ये जे बदल पालक अपेक्षितात त्या वाटेवर चालण्याची सुरुवात करण्याची जबाबदारी पालकांचीच आहे याची खूणगाठ आतापासूनच मारायला हवी.

- Advertisment -

ताज्या बातम्या