Thursday, February 5, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २० जून २०२५ - केशराच्या पावसाचा चकवा

संपादकीय : २० जून २०२५ – केशराच्या पावसाचा चकवा

मारुती चितमपल्ली नावाच्या केशराच्या पावसाने ऐन मान्सूनच्या काळात रसिकांना चकवा दिला आणि तो अरण्याच्या गूढ वाटेवर कायमचा निघून गेला. अरण्यऋषीची अरण्यालाच कायमची भूल पडली. जंगलांनी मारुती चितमपल्ली यांचे जीवन समृद्ध केले आणि त्यांच्या पुस्तकांनी जंगलवेड्यांचे. ते आणि निसर्ग या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. ‘घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावेत’ ही विं.दा. करंदीकर यांची भावना ते शब्दश: जगले. निसर्गाकडून त्यांना जे मिळाले त्याची त्यांनी मनसोक्त उधळण केली.

जंगलवेडी माणसे घडवून, जंगलाप्रतीच्या लोकांच्या जाणिवा समृद्ध करून त्यांनी निसर्गाचे देणे त्याला परत केले. त्यांनी लोकांना जंगल वाचायला शिकवले. निसर्गलेखनाचे दालन साहित्यिकांसाठी खुले केले. अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत सव्वीस पुस्तके लिहिली. पक्षिकोशाची निर्मिती केली. वृक्षकोश आणि मत्स्यकोशाचे स्वप्न पाहिले होते. एक लाख नवीन शब्द मराठी भाषेला दिले. ते शब्द कोणत्याही पुस्तकाऐवजी विदर्भाच्या जंगलातील आदिवासींच्या बोलीत सापडतील असे ते म्हणत. ‘चकवाचांदण’ हे त्यांचे आत्मकथन. ते घुबडाचे नामाभिधान आहे असे ते सांगत. या शब्दाने घुबडाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली.

- Advertisement -

केशराचा पाऊस कसा पडतो याचे कोडे त्यांनीच एकदा उलगडले होते. डिसेंबर महिन्यात मेळघाटातील झाडांना फुले येतात. फुलांचे केशर हवेत उडते. पहाटेच्या दवाबरोबर ते अंगावर पडते असा स्वानुभव त्यांनी कथन केला होता. जंगलाच्या अभ्यासाचा ध्यास त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. एक नोंदवही ते सतत जवळ बाळगत. नोंदी करून त्याची खात्रीही करून घेत. संपादन करून त्यांच्या नुसत्या नोंदवह्या जरी प्रकाशित केल्या तरी निसर्गातील अद्भूत साहित्याची मेजवानी रसिकांना मिळेल असे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर म्हणत. ते दोघे खास दोस्त होते. ‘विद्या विनयेन शोभते’ याचे मूर्तिमंत उदाहरण होते.

YouTube video player

प्रतिभावंत लेखक, पक्षिशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक, व्यासंगी संशोधक अशी त्यांची समाजात ओळख होती. ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. त्यांचा अनेक भाषांचा अभ्यास होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. पण त्याचा अहंकार त्यांना नव्हता. प्रसिद्धीची हौस नव्हती. व्याख्यान, लोकसंवाद, मुलाखती सुरु असायच्या. पण त्यामुळे वाचन, संशोधन आणि लेखनाला पुरेसा वेळ मिळत नाही असे तर म्हणत. जो भेटेल त्याला ते आपलेच वाटत. प्रामाणिकपणे सरकारी नोकरी करता येते. ती करता करता संवेदनशीलता जपता येते. प्रामाणिकपणे नोकरीला जगण्याचे साधन बनवले तर जगणे गाणे होते याचा वस्तुपाठ म्हणजे मारुती चितमपल्ली. त्यांच्या जाण्याने जंगल खर्‍या अर्थाने पोरके झाले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : भरदिवसा घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील केडगाव भागात एका विवाहितेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घर उघडे असल्याचा फायदा घेऊन एका व्यक्तीने घरात प्रवेश केला...