प्रतिभाशाली आणि म्हणूनच प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या विहित कार्यातून कधी ना कधी निवृत्त होतात. तथापि रसिकांच्या मनावर कालातीत अधिराज्य गाजवतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जगाला कधीच विसर पडत नाही. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली हे त्यापैकीच एक नाव. ते नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, पण त्याची चर्चा यानंतरही दीर्घकाळ सुरूच राहील.
विराट यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम रचले. शारीरिक क्षमतेचे नवे मापदंड उभे केले. शाकाहाराचा स्वीकार केला. पण त्याचबरोबरीने अनेकदा निराशेचाही सामना केला. त्याची चर्चा जाहीरपणे करण्याचे धाडसही दाखवले. आक्रमकता हे त्यांचे स्वभाववैशिष्ट होते. क्रिकेट जगताने त्यांना डोक्यावर घेतले. पण त्याच जगात टोकाची उपेक्षाही त्यांच्या वाट्याला आली. पण ते डगमगले नाहीत. मैदान सोडून देण्याचा विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही. वाट्याला आलेल्या प्रत्येक संकटाकडे त्यांनी संधी म्हणूनच पाहिले आणि संकटाचा सामना केला.
काळ कोणताही असो, त्यांनी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर ठेवले. हेच वर्णन त्यांच्या पत्नीला देखील तंतोतंत लागू पडते. अनुष्का शर्मा या त्यांच्या सहचारिणी. त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. विवाहानंतर आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या सहप्रवासात त्यांनी एकमेकांना साथ दिली. स्वभावातील आक्रमकता, क्रोध आणि निराशेवर मात करणे वाटते तितके सोपे अजिबातच नसते. एवढी ताकद त्यांनी कशी कमावली? कुठून मिळवली? आध्यात्मिकतेचे अधिष्ठान हे त्याचे एक उत्तर आहे. त्यांचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांची त्यांनी घेतलेली भेट माध्यमांचे नेहमीच आकर्षण राहिली. पण त्यांनी दोघांनी मात्र त्याची कधीही फारशी चर्चा केली नाही. उलट गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याला प्राधान्य दिले असावे.
गुरूंसोबत त्यांची जी प्रश्नोत्तरे होतात त्याचे व्हिडीओ माध्यमांवर फिरतात. त्यावरून देखील ते अधोरेखित होते. हाच प्रेरणादायी आणि अनुकरणीय वारसा त्यांनी युवा पिढीला दिला आहे. छोट्या मोठ्या कारणांवरून युवांना निराशा ग्रासते. अनेक जण जगणे नाकारतात. परिस्थितीला दोष देऊन हतबल होतात. पण जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतो. फक्त तुम्हाला तो शोधावा लागतो. तशी क्षमता कमवावी लागते. स्वभावदोष स्वीकारून त्यांच्यावर काम करावे लागते. यशाची ज्याची त्याची व्याख्या वेगवेगळी असते हे खरे. पण उपरोक्त बदल ज्यांना जमतात त्यांची गणना समाज एक समाधानी व्यक्ती म्हणून करतो. विराट आणि अनुष्का हे त्याचे चपखल उदाहरण आहेत. ‘तुम भी चलो.. हम भी चले..चलती रहे जिंदगी..’ हेच त्यांनी दाखवून दिले आहे.