Friday, January 23, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २२ जानेवारी २०२६ - धक्कातंत्र नव्हे; विचारपूर्वक

संपादकीय : २२ जानेवारी २०२६ – धक्कातंत्र नव्हे; विचारपूर्वक

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नितीन नबीन विराजमान झाले आहेत. त्यांच्या निवडीने अनेकांना वाटलेले आश्चर्य कदाचित यापुढे आणखी काही दिवस ओसरणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची अनेक संभाव्य नावे चर्चेत होती. जाणकारांकडून अंदाजही व्यक्त केले जात होते. नबी यांच्या निवडीने ते अंदाज सपशेल अफवा ठरले. त्यांंची जेव्हा पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली तेव्हासुद्धा अनेकांना त्यांची माहिती इंटरनेटवर शोधावी लागली असावी. राष्ट्रीय स्तरावर त्यांचा चेहरा इतर दिग्गज नेत्यांच्या तुलनेत तसा अनोळखी होता. जेव्हा माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना काही काळाची मुदतवाढ दिली गेली, तेव्हा समाजवादी पक्षाने भाजपवर त्यावरून टीका केली होती. पक्ष अध्यक्ष देखील निवडू शकत नाही असे म्हटले होते. त्यावर, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते.

- Advertisement -

नबीन हाडाचे कार्यकर्ते आणि पक्ष सर्वोपरी मानणारे आहेत. त्याचे अनेक दाखले त्यांचे सहकारी देतात. ते पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी मंत्रिपदेही भूषवली. अशी ओळख असणारे काही चेहरे इतरही पक्षात किंवा राजकारणात असू शकतील. तथापि, नबी यांचे विद्यार्थी परिषदेत आघाडीचा कार्यकर्ता म्हणून काम करणे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री पद भूषवणे त्यांचा राजकीय प्रवास वेगळा ठरवते. तळागाळापासून काम करणे त्यांचे संघटनकौशल्य अधोरेखित करते. काम हीच त्यांची ओळख असावी असे नबी नेहमी म्हणतात. त्यांच्या याच कामाने त्यांना पक्षाध्यक्षपद बहाल केले आहे. म्हणजेच ते उच्च दर्जाचे संघटक आहेत. त्यांना दूरदृष्टी आहे. ते पक्षकार्य सर्वोपरी मानतात. तुलनेने तरुण असल्याने अधिक काळ सहज काम करू शकतात. पक्ष विस्ताराची आव्हाने पेलू शकतात हे पक्षनेतृत्वाला मान्य आहे किंवा नेतृत्व त्यांना जवळचे मानते.

YouTube video player

अनोळखी चेहर्‍यांची महत्वाच्या पदांवर निवड करून फक्त समाजालाच नव्हे तर सक्रिय राजकारणाला देखील असे धक्के भाजप नेतृत्वाने याआधीही अनेकदा दिल्याचे आढळते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही त्याची काही चपखल उदाहरणे. नबी हा त्या दृष्टिकोनाचा पुढचा चेहरा आहेत. नबीन यांची नवी ओळख, पदसिद्ध अधिकार आणि त्यांच्या पदाचे महत्व पक्षातील ज्येष्ठांपासून नव्या कार्यकर्त्यांसमोर पंतप्रधानांनी ठसठशीत तर केलेच; पण नबी ही त्यांची निवड आहे हेही उपस्थितांच्या मनावर नकळत बिंबवले. मी जरी पंतप्रधान असलो तरी, पक्षाध्यक्ष या नात्याने नबी हे माझे बॉस आहेत हेच ते वक्तव्य. अध्यक्षपदाची आस पक्षातील अनेक ज्येष्ठांना होती असे बोलले जात होते. त्यांनीही नबी यांचे नेतृत्व आता मान्य करावे असाही संदेश पंतप्रधानांनी दिला असेही म्हटले जाऊ शकेल. अनेक दशके सक्रिय राजकारणात असून देखील नबी कोणत्याही वादात अडकलेले आढळत नाहीत. ही प्रतिमा त्यांच्या पसंतीत भर घालणारी ठरली असू शकेल.

भारतीय जनता पक्ष घराणेशाही किंवा राजकीय वारसा महत्वाचा मानत नाही, असे ज्येष्ठनेते नेहमीच उच्चरवात सांगत असतात. नबी यांची निवड त्यांचा तो दावा अधिक बळकट करणारी आहे. पक्षांतर्गत सगळे उपचार पार पाडल्यानंतरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली गेली. भाजपची विजयी घोडदौड सुरूच आहे. नुकतीच महाराष्ट्रात देखील विजयी पताका फडकली. आगामी दोन वर्षात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये विधानसभा निवडणुका होतील. ती राज्ये जिंकण्याचे भाजपचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. पक्षाध्यक्ष म्हणून ती नबीन यांची देखील जबाबदारी असेल. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचा निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन, रणनीतीची आखणी, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन मोलाची भूमिका बजावते.

याव्यतिरिक्त आपल्यालाही विश्वासात घेतले गेल्याची भावना तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करणे, त्यांना प्रेरणा देणे, कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ हा संस्कार त्यांच्या मनावर बिंबवणे याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या मानल्या जातात. ही स्वभाववैशिष्ट्येच व्यक्तीला उत्तम संघटक बनवू शकतात. नबी यांची ती ओळख जुनी आहे. येत्या काळात ती अधिकाधिक ठसठशीत होत जाईल अशी पक्ष कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव हा सगळ्याच राजकीय पक्षांचा मुख्य कार्यक्रम आढळतो. त्यासाठीच विरोधी पक्ष एकत्र येतात; पण तो दरवेळी फार्सच ठरतो आहे. तथापि, एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवासात राष्ट्रीय अध्यक्ष व्यापक अर्थाने किती महत्वाचा असतो हा धडा भाजपने घालून दिला आहे. त्यातील मर्म विरोधी पक्ष आता तरी लक्षात घेतील का?

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....