Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमShrigonda : मंदिरात चोरी करणारे दोघे सराईत जेरबंद

Shrigonda : मंदिरात चोरी करणारे दोघे सराईत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || 10.52 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर / श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल-रूख्मिणी मंदिराच्या गाभार्‍यातून चांदीचे मौल्यवान दागिने चोरीस गेल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावत संगमनेर तालुक्यातील दोन सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 52 हजार 600 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

13 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणी येथील विठ्ठल-रूख्मिणी मंदिराच्या गाभार्यातील कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिराशेजारी गावकर्‍यांनी बसविलेल्या महादेवाच्या प्रतिकृतीवरील 1 किलो 873 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिर चोरीची गंभीरता व ग्रामस्थांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.

पथकाने मंदिर चोरीतील सराईत गुन्हेगारांचा अभ्यास, गुन्हा करण्याची पध्दत व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना सदर गुन्हा हा संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील भास्कर खेमा पथवे व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. सलग चार दिवस संशयित आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. अखेर संशयित आरोपी हे चारचाकी वाहनातून संगमनेरकडून पारनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर टाकळी ढोकेश्वर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. भास्कर खेमा पथवे (वय 50) व राजेंद्र ठकाजी उघडे (वय 33, दोघे रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत.

तपासादरम्यान त्यांनी त्यांचा साथीदार संजय भास्कर गावडे (रा. नांदुरी दुमाला) याच्यासह मंदिर चोरी केल्याची कबुली दिली असून तो सध्या पसार आहे. दोघांच्या ताब्यातून चांदीचा मुखवटा, दोन मोबाईल, चोरीसाठी वापरलेली हत्यारे, रोख रक्कम व कार असा 10 लाख 52 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, आकाश काळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

पाच गुन्हे उघडकीस
तपासात संशयित आरोपींकडून नगर जिल्ह्यातील बेलवंडी, पारनेर, राजूर, आश्वी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य संशयित आरोपी भास्कर पथवे हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ghoti Crime News : गोंदे MIDC गोळीबार प्रकरणाचा एलसीबीकडून छडा; एक...

0
घोटी | वार्ताहर | Ghoti वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Wadhivhare Police Station Area) गोंदे एमआयडीसी परिसरात घडलेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)...