भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास कोणत्या दिशेने जाणार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने स्पष्ट केले. परिषदेचे ध्येयवाक्य देखील ‘सर्वजनहिताय-सर्वजनसुखाय’ हेच होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियंत्रण मानवाच्याच हातात असायला हवे. या युगात माणूस केवळ डेटा पॉईंट उरू नये याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तंत्रज्ञान सर्वसमावेशक असावे. त्यात नैतिकता असावी, असेही पंतप्रधान म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी चेहरा प्रदान करण्यात हित आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला सामान्य माणसाच्या विकासाची ताकद बनवले जाऊ शकते. शेतकरी, छोटे दुकानदार, छोटेमोठे व्यवसाय करणारी सामान्य माणसे यांना देखील याचा फायदा व्हायला हवा. त्यांचेही जगणे सुकर व्हायला हवे. भारत त्याच दिशेने वाटचाल करतो आहे अशी भावना या परिषदेने निर्माण केली. तरुणांचा देश अशी भारताची जगात ओळख आहे. त्यांना स्वप्ने दाखवण्याचे काम अशा परिषदा करतात.
काही दशकांपूर्वीपर्यंत अशा परिषदा अपवादाने भरवल्या जायच्या. याला त्याकाळातील मर्यादा असेही म्हटले जाऊ शकेल. तो काळ समाजमाध्यमांचा नव्हता. परिणामी तंत्रज्ञान, कौशल्य विकासाच्या किंवा अन्य बहुसंख्य क्षेत्रात जागतिक पातळीवर काय घडत आहे हे भारतीय-विशेषतः युवांपर्यंत फारसे पोहोचत नसे. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार संधीच्या शोधात देश सोडून जाणार्यांचे प्रमाण जास्त होते. यालाच प्रतिभेचे स्थलांतर (ब्रेन ड्रेन) असे म्हटले जाते. पण जेव्हा एखादा देश काळाची पावले ओळखून अशा परिषदा भरवतो तेव्हा, त्या त्या क्षेत्रातील बदलांकडे तो देश गंभीरपणे बघतो, त्यात देशाला रुची आहे, त्या क्षेत्रात काम करण्याची देशाची मनीषा आहे हे लोकांच्या मनावर ठसवले जाते. आतापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘सर्व्हिस सेक्टर’ अशी भारताची प्रतिमा आहे. त्या क्षेत्रात संशोधन करून उत्पादन आधारित (प्रॉडक्ट बेस) विकास असे चित्र फारसे नव्हते. अशा परिषदा त्याला वाव देतात. संशोधन आणि विकासात देशाला रस आहे व देशाच्या पाठबळाची आशा युवांच्या मनात निर्माण करतात. उत्पादनावर आधारित विकास रोजगारपूरकच असतो.
या परिषदेत झालेले अनेक करार, मुकेश अंबानी यांनी जाहीर केलेला दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आराखडा, सॅम अल्टमन यांनी मुंबई आणि बंगळुरू येथे ओपन एआयचे कार्यालय उघडण्याची केलेली घोषणा, अशा घडामोडी युवांसाठी उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरू शकतात. अर्थात, त्या भावनेला खतपाणी घालणारे वातावरण, जागतिक दर्जाची संशोधन व्यवस्था-परिसंस्था, धोरण व प्रशासकीय लवचिकता, आर्थिक पाठबळ महत्वाचे असते हे शीर्ष नेतृत्व जाणून असेलच. कृत्रिम बुद्धिमत्ता नव्या जगाची भाषा मानली जाते. एआयमुळे रोजगार प्रभावित होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. कोणकोणत्या क्षेत्रांवर परिणाम संभवतात याचे अंदाज तज्ञ व्यक्त करतात. रोजगार कमी होणार नाहीत. नव्या संधी निर्माण होतील. रोजगाराची क्षेत्रे बदलतील असे मुकेश अंबानी यांच्यासारखे ज्येष्ठ उद्योगपती म्हणतात. अशा मतमतांतरांमुळे युवा पिढी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांच्या बाबतीत संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळेच परिषदेच्या निमित्ताने विशेषतः युवा पिढी यातील संधी आणि परिणाम जाणून घेण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे या परिषदेला भेट देणार्यांमध्ये युवांचा सहभाग लक्षणीय होता.
सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त संशोधक, विद्यार्थी आणि युवांनी नोंदणी केली होती असे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत मागे नाही. उलट त्याला भविष्य मानतो. कारण विकसित तंत्रज्ञान असलेले देश भविष्यात जगावर राज्य करतील हे भारत जाणून आहे. भारताच्या बलस्थानांमधील गरजांनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यावर भर दिला जाईल, हे जागतिक पातळीवर ठसवण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला गेला. या परिषदेत अशा उत्साहवर्धक अनेक गोष्टी घडल्या. समाजजीवनावर परिमाण करणारे प्रकल्प सादर झाले. भारताच्या ‘सर्वम एआय’ने सुंदर पिचाईंसह अनेक दिगज्जांचे लक्ष वेधून घेतले. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान क्षणार्धात करणारा प्रकल्प व्यावहारिक पातळीवर अमलात आणला जाईल तो दिलासा देणारा ठरेल. विविध पद्धतीचे रोबोट बघण्यासाठी गर्दी झाली होती. सहभागी झालेले युवा प्रेरणा घेऊन परतले असू शकतील. तंत्रज्ञान बदलाच्या वेगाचे भान आणि ते आत्मसात करण्यासाठी अपरिहार्य क्षमता आणि कौशल्य विकास याचा अंदाज त्यांना आलेला असू शकेल. त्यातील संधी आणि बदलत्या रोजगारांच्या क्षेत्रांची चाहूल त्यांना लागली असू शकेल. अशा परिषदा देशाची जागतिक प्रतिमा बळकट करतात. तथापि, यालाही काही अनुचित घटनांचे गालबोट लागले. जे लागायला नको होते.





