Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २३ जानेवारी २०२५ - दुहेरी यश अभिमानास्पद!

संपादकीय : २३ जानेवारी २०२५ – दुहेरी यश अभिमानास्पद!

भारताच्या खेळाडूंनी नुकताच दोनदा धमाका केला. भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंच्या संघाने खो-खो खेळाच्या पहिल्याच विश्वचषकावर देशाचे नाव कोरले. या स्पर्धेत चोवीस देशांचे संघ सहभागी झाले होते. पंतप्रधानांपासून सर्वांनी विजयी संघांचे अभिनंदन केले. खो-खो हा देशातील आणि महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ आहे, पण देशात काही विशिष्ट खेळांनाच प्रतिष्ठा आणि लोकाश्रय लाभला आहे.

खो-खोसह अन्य काही खेळ त्या अर्थाने काहीसे दुर्लक्षित राहिले आहेत. वास्तविक कोणतेही मैदानी खेळ खेळण्यासाठी आणि त्यात अव्वल दर्जा मिळवण्यासाठी सारखेच परिश्रम करावे लागतात. आचार आणि विचारात खेळ नेहमीच प्रथम प्राधान्यावर ठेवावा लागतो. तरीही प्रतिष्ठेच्या बाबतीत नकळत भेदभाव आढळतो. असा खेळ करिअरसाठी निवडणे, सातत्याने खेळत राहणे आणि अव्वल दर्जा प्राप्त करणे हे दोन्ही संघांतील सर्व खेळाडूंसाठी सोपे नव्हतेच. त्यामुळे खो-खो किंवा बुद्धिबळ खेळातील असे लखलखीत विजय या खेळांकडे समाजाचे लक्ष वेधून घेतात.

- Advertisement -

या खेळांमध्येही भवितव्य आहे, या खेळांनाही प्रतिष्ठा मिळू शकते, या धारणा मजबूत करतात. माध्यमांचेही लक्ष वेधून घेतात. अव्वल दर्जा गाठण्यासाठी सर्वांनाच घाम गाळावा लागतो. येथे पुरुष आणि महिला खेळाडू असा भेद नाही किंवा हे भेदाच्या दृष्टिकोनाचा पुरस्कार करणेही नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यातील मुलींना मुलांच्या तुलनेत अजूनही साधे खेळ खेळणेदेखील काहीसे दुरापास्तच आहे. खेळात अव्वल दर्जा गाठण्यासाठी सातत्य आणि समर्पण अत्यावश्यकच असते. ते मुलींसाठी तुलनेने थोडे कठीण असू शकते. कारण मुलींना वाढवताना समाज अजूनही पारंपरिक दृष्टिकोन अवलंबताना दिसतो. मुलींचे खेळही त्याला दुर्दैवाने अपवाद नाहीत. परिणामी थोड्या मोठ्या वयाच्या मुलींनी वेगळी वाट चोखाळू नये, अशीच बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते.

या पार्श्वभूमीवर मुलींनी तो खेळ निवडला, त्यात विशेष प्राविण्य मिळवले. मात्र त्यासाठी त्यांना स्वतःच्या, पालकांच्या आणि समाजाच्या धारणांशी संघर्ष करावा लागला असेल. भारताच्या महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे ही बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील कळम आंबा गावची कन्या आहे. अश्विनी शिंदे मोहोळ तालुक्यातील खंडोबाची वाडीची, रेशमा राठोड बदलापूरची, वैष्णवी पवार कोल्हापूर करंजीवणे तालुक्यातील कागलची! या काही खेळाडूंच्या गावांचा उल्लेख एवढ्यासाठीच की, त्यांचा विश्वचषक संघापर्यंत पोहोचायचा प्रवास किती खाचखळग्यांचा होता ते दर्शवतो.

प्रत्येक खेळातील अशा सर्वच खेळाडू मुलींचे खेळणे स्वीकारार्ह बनवतात. त्यांची खेळण्याची वाट प्रशस्त करतात. प्रतिकूलतेला दोष देण्यापेक्षा ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि प्रयत्नात सातत्य राखले तर कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च टोक गाठणे अशक्य नाही, हाच संदेश देतात. दोन्ही विजेत्या संघांचे अभिनंदन!

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...