Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २३ जुलै २०२४ - वेळ अजूनही गेलेली नाही

संपादकीय : २३ जुलै २०२४ – वेळ अजूनही गेलेली नाही

पालक आणि मुलांमधील पार संपत चाललेला संवाद किंवा अडनिड्या वयातील विसंवाद हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. तथापि ज्या कुटुंबात असा संवाद असतो त्या कुटुंबातील मुले त्यांच्याही नकळत सुजाण बनतात. याचा अनुभव नुकताच लखनौ पोलिसांना आणि पालकांना आला. त्या घटनेचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. ते असे, एक मुलगी पाचवीत शिकते. तिचे वडील राजकीय नेते आहेत. शाळा सुटल्याबर तिच्या अपहरणाचा प्रयत्न दुचाकीस्वारांनी केला. ‘तुझ्या बाबांनी तुला तातडीने बोलावले आहे. आम्हाला तुला घ्यायला पाठवले आहे’, असे त्यांनी तिला सांगितले. तथापि ‘अनोळखी व्यक्तींबरोबर जायचे नाही आणि कोणी काही दिले तर खायचे नाही असे माझ्या आईने मला सांगितले आहे’ असे त्या मुलीने त्या व्यक्तींना सांगितले. ते मुलीला जबरदस्ती करत होते. ते गर्दीचे ठिकाण असल्याने त्यांनी तिथून पळ काढला, मुलगी घरी गेल्यावर वडिलांनी तिला बोलावले नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : २२ जुलै २०२४ – योजना स्वागतार्ह; पण..

- Advertisement -

हेच कारण सांगून मुलांचे अपहरण केल्याच्या घटना अधूनमधून घडतात. उपरोक्त घटनेतील मुलीला तिच्या आईने काही गोष्टी शिकवल्या नसत्या तर चित्र कदाचित वेगळे असू शकले असते. मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी संबाद आत्यंतिक गरजेचा असतो. तो साधण्यासाठी वेळ काढावा लागतो. ज्याची उणीव असल्याचा बहाणा सतत पुढे केला जाताना आढळतो. तथापि संवादाची गरज आणि वेळ वाया कुठे जातो याचे अवलोकन किती पालक करत असतील? संस्कार करण्यात गोष्टी आणि बोधकथा मोलाची भूमिका बजावतात. मोठ्यांचा आदर करणे, सकारात्मक विचार करणे, नम्रता, प्रामाणिकपणा, प्रेम, आपुलकी, साहचर्य, सहनशक्ती किंवा कर्तव्यभावना अशा अनेक गोष्टी सहज मारलेल्या गप्पांमधूनही शिकवल्या जाऊ शकतात. त्या मुलीच्या आईने तिला सावधान कसे राहायचे, प्रसंगांचा सामना कसा करायचा हे शिकवले असावे म्हणूनच ती मुलगी धाडसाने तिचे अपहरण टाळू शकली.

हे देखील वाचा : संपादकीय : २० जुलै २०२४ – वाचन सवयीच्या दिशेने टाकलेले पाऊल

विसंवादाचे विपरित परिणाम समाजाच्या अनुभवास येतात. बालगुन्हेगारी वाढत आहे. किरकोळ कारणांसाठी १५- १६ वर्षांची मुले एकमेकांच्या जीवावर उठतात. शाळेतील त्याच वयाची मुले त्यांच्याच मित्रांवर रॅगिंग करतात. अनेक मुले व्यसनांच्या आहारी जातात. तेव्हा मुलांना संस्कार किंवा वळण नाही, असे सरसकट बोलले जाते. पण ते लावण्यात त्यांचे पालक कमी पडले असू शकतील का? याकडे समाजाचे दुर्लक्ष होत असू शकेल का? तथापि याबाबतीत सद्यस्थिती चिंताजनक असली तरी अजूनही वेळ गेलेली नाही हे पालक लक्षात घेतील का?

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या