हास्य हा मानवाचा अनमोल दागिना आहे. हा सुविचार शाळेतील फलकावर लिहिलेला असतो. आता तो सर्वेक्षणाचाही विषय ठरला आहे. चंदीगडस्थित एका सामाजिक संस्थेतर्फे देशातील पहिलेच हास्य सर्वेक्षण केले गेले. त्यासंदर्भातील वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले तेच. माणसे हसणे विसरत चालली असावीत, असे अनेकांना वाटत असले तरी सर्वेक्षणकर्त्यांची निरीक्षणे मात्र उत्साहवर्धक आहेत.
हसणे हे ताणतणावावरचे औषध असल्याचे किमान ऐंशी टक्के लोकांना मान्य आहे तर सुमारे पन्नास टक्के लोकांच्या चेहर्यावर त्यांचे मित्र आणि जवळच्या नातेवाईकांमुळे हास्य फुलते असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. निमित्त कोणते का असेना माणसे हसतात ही आनंद वार्ता आहे. अन्यथा, बहुसंख्य माणसे त्यांचे स्वाभाविक हसणे विसरत चालली असावीत हा अशी शंका यावी असेच चेहरे भोवताली आढळतात. विविध प्रकारचे ताणतणाव, आर्थिक अस्थिरता, महागडे होत चाललेले शिक्षण आणि वैद्यकीय उपचार, सामाजिक प्रश्नांवरून अधूनमधून धोक्यात येणारी सामाजिक शांतता यात माणसे हसणे विसरली तर त्यात नवल मानले जाऊ शकेल का? या सगळ्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होणे स्वाभाविकच.
प्रसन्न मन हे सर्व सिद्धीचे कारण असे संतांनी सांगितलेच आहे. हसणे मन प्रसन्न करते. हास्याचे आरोग्यदायी फायदे मानसतज्ज्ञ सांगतात. हसण्यामळे मेंदूतून एंड्रोफिन स्त्रवते. जे आनंददायी संप्रेरक (हॅपी हार्मोन) मानले जाते. त्याच्या नावातच आनंद आहे. या संप्रेरकांमुळे माणसांचा मूड बदलतो. ताण कमी होतो. वेदना असतील तर त्या कमी होतात. हसण्यामुळे जबड्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. अशी मानसिक अवस्था समाधानाची भावना निर्माण करते. ताणतणाव किंवा बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी माणसांना खर्च करावा लागतो. अनेकदा अनेकांसाठी तो न झेपणारा असू शकतो. तथापि हसण्यासाठी मात्र कोणतीही झळ सोसावी लागत नाही. ते माणसांच्याच हातात असते.
पण चेहर्यावर हास्य फुलण्यासाठी परिस्थितीचा स्वीकार करण्याची तयारी मात्र दाखवावी लागते. ताण घेऊन परिस्थिती बदलत नाही याची खूणगाठ मनाशी बांधावी लागते. असे घडले तर मन शांत होऊ शकेल. शांत मन योग्य विचारशक्तीला बळ देते. योग्य विचार ताण कमी करू शकतील. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच स्वतःला मदत करावी लागते. हसणे या त्या मदतीचाच एक भाग मानला जाऊ शकेल. तेव्हा ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ हेच खरे. ज्याची आठवण उपरोक्त सर्वेक्षणाने माणसांना करून दिली आहे.