राज्यातील राजकारणाचे रंग पाहून मतदारांना डॉ. राहत इंदोरी यांच्या ओळी आठवू शकतील. ते एका कवितेत म्हणतात, ‘झूठों ने झूठों से कहा है सच बोलो, घर के अंदर तो झूठों की एक मंडी है, दरवाज़े पर लिखा हुआ है सच बोलो’. राज्यातील सगळ्याच राजकीय पक्षांना हे वर्णन चपखल बसू शकेल. सगळ्यांच्या कथनी आणि करणीत जमीन-अस्मानाचे अंतर आढळते. विधानसभेत युती आणि आघाडी हा सर्वांच्या परवलीचा शब्द बनला आहे. फक्त ती कोणाची कोणाशी आणि कधी होऊ शकेल हे कदाचित कोणताही नेता निदान आज तरी सांगू शकणार नाहीत. तत्त्वे आणि पक्षाची विचारधारा सगळे पक्ष मिळून फक्त तोंडी लावणे ठरवत असावेत. अन्यथा कालपर्यंत ज्याच्या नावाने जाहीर व्यासपीठांवरून खडे फोडले त्यांच्याच गळ्यात गळा घालायला सगळेच पक्ष तयारीत आढळतात.
सर्वांचा उद्देश स्वबळावर सत्ता मिळवणे हा आहे. तो असायला मतदारांची हरकत नसते. किंबहुना, सत्तेभोवतीच सगळे राजकारण फिरते. सत्ताप्राप्ती हाच राजकीय पक्षांचा अंतिम उद्देश असतो. महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहेत. परिणामी, राज्याचे राजकारण रंगात आले आहे. ‘रंगात रंगुनी सार्या.. रंग माझा वेगळा’ हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. एरवी सगळे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून वावरत असले तरी कोणतीही निवडणूक जाहीर झाली की राजकारणाचे खरे रंग मतदारांना अनुभवायला मिळतात. सध्याचेच उदाहरण घेतले जाऊ शकेल. गेली अनेक वर्षे केंद्रापासून तळागाळापर्यंत युती आणि आघाड्यांकडे कल वाढला आहे. स्वबळावर सत्ताप्राप्ती आगामी काही काळ तरी शय होऊ शकेल का, याविषयी मुख्य राजकीय पक्षदेखील साशंक असतील. त्यामुळे युती आणि आघाडीला पर्याय नाही, हेच वास्तव आहे.
पण एकदा युती किंवा आघाडी केली तर ती एका निवडणुकीपुरती तरी टिकेल की नाही हे त्या-त्या पक्षांचे धुरिणदेखील नक्की सांगू शकणार नाहीत. विचार जुळतात म्हणून आम्ही एकत्र आलो, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र विरोधात लढायचे, असा हा मामला आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा मुलामा चढवला की वाटेल तशा कोलांटउड्या मारायला सगळेच मोकळे होताना दिसतात. मैत्री होती तर वेगळी चूल का मांडावी लागली? पक्ष का सोडावा लागला? तत्त्वांसाठी पक्ष सोडला तर पुन्हा त्यांच्याशीच युती कशी? याची उत्तरे मतदारांना कोण देणार? युती आणि आघाडीत राजकीय पक्षांना रस असला तरी मतदार आणि कार्यकर्त्यांचे काय? सगळ्या पक्षांची नावे सगळ्या पक्षांशी जोडली जाण्याने कार्यकर्त्यांची किती भंबेरी उडवत आहोत याचे सर्वांचे भान पुरते सुटले आहे. इकडे कार्यकर्ते झेंडे नाचवतात. बेंबीच्या देठापासून घोषणा देतात. आपसात भिडतात. अनेक प्रकरणे पोलीस स्टेशनपर्यंत जातात. दुसरीकडे, ज्या नेत्यांसाठी ही सगळी उठाठेव केली तो नेता नक्की कोणत्या पक्षात आहे याविषयी कोण कोणाला खात्री देऊ शकेल? कार्यकर्ते रात्री त्यांच्या नेत्याच्या पक्षाचा प्रचार संपवून घरी जातात. सकाळी उठेपर्यंत नेत्याचा दुसरा पक्षप्रवेश झालेला त्यांच्या अनुभवास येऊ शकेल अशीच सद्यस्थिती आहे.
पक्षाचे पाठीराखे ही त्या त्या पक्षाची ताकद असते. त्यांना गृहीत धरण्याची खोड सर्वच राजकीय पक्षांना जडली आहे. मतदार कुठे जातील? मतदान करतीलच! निवडणुकीच्या काळात त्यांना महत्त्व दिले तरी पुरते. ते लोकशाहीचा कणा आहेत असे सांगितले की मतदार खूश होतात, असा भ्रम सर्वांना झाला असावा. म्हणूनच आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकपात्री प्रयोग रंगायला सुरुवात झाली आहे. कोणी बूट पॉलिश करतो आहे. कोणी अचानक कार्यकर्त्यांच्या घरी जातो आहे. ज्येष्ठांच्या अगदी भर बाजारातदेखील पायावर डोके ठेवतो आहे. भारताला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. परिस्थिती कोणतीही आणि कशीही असो, माणसाला स्थितप्रज्ञ राहता आले पाहिजे, असा उपदेश थोर संत-महात्मे करतात. पण नेते तो उपदेशदेखील कोळून प्यायले असावेत. अन्यथा कालचा शत्रू आजचा मित्र बनतो..शत्रूचा शत्रू गळाभेट घेतो..कालचा मित्र आजचा शत्रू बनतो..तत्त्वांच्या नावाखाली कालपर्यंत बरोबर असणारा आज दुसर्या टोकाला जातो.. असे सगळे घडत असतानाही नेत्यांच्या चेहर्यावरचे लबाड हसू कायम कसे राहिले असते? तात्पर्य, मिळून सार्यांनी जनतेला वेड्यात काढायचा कार्यक्रम जोरात सुरू केला आहे.




