Tuesday, July 2, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २४ जून २०२४- खारीचा वाटा मोलाचा…

संपादकीय : २४ जून २०२४- खारीचा वाटा मोलाचा…

सहा ऋतूंच्या सहा सोहळ्यांचे वर्णन करून कवी मंगेश पाडगावकर लोकांना जगण्या-मरण्यावर शतदा प्रेम करायला शिकवतात खरे. मात्र, सध्या तरी लोकांच्या वाट्याला उष्णतेच्या झळाच जास्त येत आहेत. कोणता ऋतू संपून कोणता ऋतू सुरु झाला हेच लोकांना कळेनासे झाले आहे. सध्याचे दिवस पावसाचे आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसारही मोसमी पाऊस हळूहळू देश व्यापत आहेत, पण ऐन पावसाळ्यात देशाच्या विविध भागांत उष्णतेने कहर मांडला आहे.

- Advertisement -

देशाच्या राजधानीसह अनेक राज्यात 130 जणांचे उष्णतेमुळे बळी गेल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. उत्तर आणि पूर्व भारतात अनेक ठिकाणी गेले काही दिवस उष्णता ठाण मांडून बसली आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ‘ग्लोबल वोर्मिंग’ असा त्याचा उल्लेख केला जातो. ही जगाची समस्या आहे. तिच्याशी काहीच देणे घेणे नाही, असा देशवासीयांचा समज होता. तथापि ते परिणाम आता लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. लहरी पाऊस, उष्णता यामुळे नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. शेती बेभरवशाची बनत आहे.

उष्माघातामुळे लोक मृत्यूमुखी पडत आहेत, हे त्याचेच परिणाम आहेत. यामुळे सामान्य जीवन आणि लोक सर्वाधिक प्रभावित होतात. वाढत्या तापमानाची सामाजिक पातळीवर अनेक कारणे सांगितली जातात. रस्त्यावर वाढती वाहन संख्या, काही ठिकाणी जाळला जाणारा कचरा, लागवडीच्या तुलनेत जास्त संख्येने सुरु असलेली वृक्षतोड ही त्यापैकीच काही कारणे! जागतिक स्तरावर सगळे देश एकत्र आले आहेत. त्यांनी सुमारे 17 ध्येये (सस्टेनेबल गोल्स) निश्चित केली आहेत. लोकंसुद्धा वैयक्तिक पातळीवर त्यांच्यापुरती ध्येये निश्चित करू शकतील का? पायी चालणे, छोट्या-मोठ्या कामांसाठी सायकल चालवणे लोक जणू विसरूनच गेले आहेत.

अनेक जण सकाळी किमान काही किलोमीटर चालतात. तो झाला त्यांचा वैयत्तिक व्यायाम! एकूणच, पर्यावरण संवर्धनासाठी त्याही पुढे काही पावले चालण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर लोक करू शकतील. अर्थात ती सेवा बळकट करणे सरकारचे कर्तव्य आहे. तथापि उपलब्ध आहे त्या सेवेचा किती लोक लाभ घेतात? प्रत्येकाला एक तर झाड लावून त्याचे संवर्धन करणे सहज शक्य होऊ शकेल. पाणी जपून वापरणे आणि ते साठवणे जमू शकेल. लोकांनी कचरा कुठेही फेकला नाही तर तो जाळलाही जाणार नाही. मी एकट्याने करून काय होणार आहे? अशी शंका अनेक जण व्यक्त करतात, पण वाढत्या तापमानाशी मुकाबला करायचा असेल तर खारीचा वाटासुद्धा मोलाचाच ठरू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या