सार्वजनिक आरोग्यसेवा हा शब्द उच्चारला तरी लोकांच्या नजरेपुढे एक ठराविक चित्र उभे राहाते. ते अतिशयोक्त नसल्याचे अनुभव लोक वारंवार घेतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यातील सरकारी आरोग्य व्यवस्था कागदावर बळकट असू शकेल. तथापि वास्तवात हजारो पदे रिक्त आढळतात. अधूनमधून त्यांची भरती प्रक्रिया सुरु होते. पण त्याचे पुढे काय होते? जसे की, सुमारे पंधरा दिवसात चारशे वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरली जातील अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये माध्यमांना दिली होती. ती पदे भरली गेली का? मुळात इतकी महत्वाची पदे पंधरा दिवसात भरली जाऊ शकतात तर ती रिक्त राहिली कशी? त्याव्यतिरिक्त दोन हजार रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरु झाली का? झाली असेल तर तिचा अंतिम टप्पा काय आहे? हे लोकांना कधीच कळत नाही.
सरकारी कर्मचार्यांची काम करण्याची मानसिकता आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्ण संवाद हा नेहमीच वादाचा विषय ठरतो. काही रुग्णालयात उपचारपूरक यंत्रे असतात पण त्यासाठीचे तंत्रज्ञ नसतात. ते उपलब्ध असले तर यंत्रे नादुरुस्त असतात. अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सुचवले जाते. पायाभूत सुविधांचीच वानवा असल्याने स्वच्छता, वातावरण, रुग्णांना मिळणारी वागणूक याकडे लक्ष कमीच वेधले जाते. तरीही सरकारी रुग्णालये नेहमीच गर्दीने ओसंडून वाहतात. कारण वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महागडे होत चालल्याने सरकारी दवाखान्याशिवाय लोकांकडे दुसरा पर्याय नसतो.
हे जरी महाराष्ट्रातील चित्र असले तरी इतर राज्यातील आरोग्य सेवेची परिस्थिती फारशी वेगळी नसू शकेल. हे चित्र बदलण्यासाठी सरकारलाच कंबर कसावी लागेल. त्याची सुरुवात हैदराबाद सनतनगर येथील कामगार विमा योजेनचे मेडिकल कॉलेज व रुग्णालयाने केली असे म्हटले जाऊ शकेल. या प्रवासाची कथा माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. या रुग्णालयातून एकाही रुग्णाला दुसर्या रुग्णालयात पाठवले जात नाही. गेल्या तीन वर्षात रुग्णालयात 26 किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. सुमारे पंधराशेहून अधिक ओपन हार्ट सर्जरी, मेंदू व मणके शस्त्रक्रिया, जटील प्रसूती झाल्या आहेत. रुग्णालयात सुमारे सहा हजार चाचण्या केल्या जातात. दररोज सरासरी तीन हजार रुग्ण सेवेचा लाभ घेतात असे प्रसिद्ध झालेल्या वृतात म्हटले आहे. हा बदल विलक्षण आशादायी आहे. सरकारी आरोग्य सेवेची पारंपरिक प्रतिमा बदलाचे आव्हान त्यांनी कसे पेलले? त्यासाठी कशा प्रकारचे नियोजन केले गेले? मानसिकता बदल कसा घडवून आणला? यासाठी हैदराबाद रुग्णालय बदल हा अभ्यासाचा विषय ठरू शकेल.




