काँग्रेस पक्षाचा जनाधार अजूनही कमी झालेला नाही, हे जवळपास प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीतून अधोरेखित होत आहे. त्याचा काहीसा प्रत्यय चार दिवसांपूर्वीच निकाल लागलेल्या नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीतून आला. त्यातूनच नेतृत्वाने बहुधा बोध घेतला असावा. कारण, आगामी महानगरपालिका निवडणूक नियोजनात पक्षाने रस दाखवला आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात राष्ट्रीय स्तरापासूनच्या नेत्यांचा समावेश आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमधील पक्षाची कामगिरी उत्साहवर्धक म्हणावी लागेल.
राज्यस्तरीय आणि केंद्रीय पातळीवरही नेतृत्वाने या निवडणुका फारशा गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. प्रचारासाठी कोणतेही बडे नेते आले नव्हते. तरीही पक्षाचे एक्केचाळीस नगराध्यक्ष आणि हजारभर तरी नगरसेवक निवडून आले. फारसे कष्ट न घेताही मतदारांनी हे दान काँग्रेसच्या पदरात टाकले. कारण पक्ष अजूनही लोकांच्या मनात आहे. या निवडणुका स्थानिक संपर्क आणि संबंधांवर लढवल्या जातात असे मानले जाते. हे जरी खरे असले तरी त्या कार्यकर्त्यांची निष्ठा पक्षनेतृत्वाने कौतुक करावी अशीच मानली जाईल. भाजपचा सत्तेचा वारू देशात चौखूर उधळला आहे. उधळत्या घोड्यावर स्वार होण्याची अनेकांची इच्छा असते. तद्वतच, भाजपत प्रवेश करणार्यांची संख्या लक्षणीय नसती तरच नवल. कोणतीही निवडणूक लागली की अशा गयारामांची संख्या वाढते. ज्यांची हयात काँग्रेस पक्षात गेली त्यांनाही तो मोह आवरलेला नाही.
या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील उपरोक्त कार्यकर्ते पक्षात टिकून राहिले. तिकीट मिळवले आणि त्यावर निवडून देखील आले. पक्षाचा पाठिंबा नसल्याची ओरड क्वचितच ऐकू आली असू शकेल. हा त्या कार्यकर्त्यांचा पराक्रम आहे. वर्षानुवर्षे दाखवलेल्या निष्ठेचे फळ त्यांना मिळाले आहे. राजकीय पातळीवर पक्षाचे मानसिक आणि सामाईक खच्चीकरण सुरू असतानाही पक्षनिष्ठा जोपासणे वाटते तितके सोपे नसते. भलेभले पक्ष सोडून गेले आहेत. यातून सर्व पातळ्यांवरील काँग्रेस नेतृत्वानेही बोध घेणे गरजेचे आहे. आता पाळी नेतृत्वाची आहे. वार्यावर सोडले अशी भावना निष्ठावान कार्यकर्त्यांचे भावनिक खच्चीकरण करू शकते. लोक अजूनही काँग्रेसला मत देतात. पक्षाचे उमेदवार निवडून देतात. ही पक्षाच्या पूर्वसूरींची पुण्याई आहे. ज्यात भर पडणे कार्यकर्त्यांना अपेक्षित असते. निवडणूक हे त्याचे एक प्रमुख माध्यम मानले जाते. एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे बघते.
भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून लोक काँग्रेसचा विचार करतात, असाही याचा अर्थ होऊ शकेल. लढाई भारतीय जनता पक्षाशी आहे. तो पक्ष सतत निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत असतो असे म्हंटले जाते. एका निवडणुकीतील विजय साजरा करताना पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू असते असे राजकीय विश्लेषक म्हणतात. उदाहरणार्थ, या पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी सुमारे महिनाभरापूर्वीच जाहीर केली गेली आहे. कोणतीही निवडणूक पक्ष नेतृत्व गंभीरपणे घेतो. उपरोक्त निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे खुद्द पंतप्रधानांनी अभिनंदन केले. तसे इतर पक्षातील प्रमुखानी क्वचितच केलेले असू शकेल. हीच दखल कार्यकर्त्यांचे मनोबल चांगलेच वाढवते. त्यांना पक्षाशी बांधून ठेवते. ही कला, निवडणूक नियोजनातील बारकावे, उमेदवार निवड, त्याला पक्षीय पाठबळ, प्रचाराचे सार्वत्रिक धोरण यातील बारकावे आत्मसात करण्याला काँग्रेसने प्राधान्य देणे गरजेचे ठरू शकेल. तसे दिले गेले तर काँग्रेसला अजूनही भवितव्य आहे.
स्टार प्रचारक नेमणे हे त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल ठरू शकेल आणि महानगरपालिका निवडणूक ही त्याची चाचणी मानली जाऊ शकेल. या निवडणुकांमध्ये कोणाशीही युती करणार नसल्याच्या धोरणावर नेतृत्व ठाम आहे. त्याची किंमत मोजायची त्यांची तयारी असू शकेल. महापालिका निवडणुकीचे कार्यक्षेत्र, प्रभाव मोठा असतो. त्यांचा अर्थसंकल्पही मोठाच असतो. त्यामुळेच या निवडणुका सगळे पक्ष गंभीरपणे घेतात. आता त्यात काँग्रेसचा समावेश केला जाऊ शकेल. तळागाळात रुजलेल्या प्रतिमेचा, ठरवले तर दीर्घकालीन फायदा करून घेतला जाऊ शकेल असेच नियोजन पक्षाला करावे लागेल. बाकी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्षप्रतिमा अनेक नागरिकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे हे वास्तव सगळेच राजकीय पक्ष निदान आता तरी खासगीत कदाचित मान्य करतील.




