राष्ट्रीय बालिका दिवस नुकताच साजरा करण्यात आला. मुलींना सक्षम बनवण्याचे महत्त्व ठसवणे, त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लिंगभेदाच्या अडथळ्यांशिवाय त्या प्रगती करू शकतील, असे वातावरण निर्माण करणे, ही या वर्षाची संकल्पना सांगितली जाते. यासंदर्भात परिस्थिती आव्हानात्मक आहे. वास्तव अस्वस्थ करणारे आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक दुर्दैवी घटना सांगितल्या जाऊ शकतात.
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच आहे. मुलगी जन्माला आली म्हणून आईच्या छळाच्या घटना अधूनमधून घडतात. तथापि याबाबतीत बदलाची आशादायक पदचिन्हे हळुहळू उमटू लागली आहेत. तुरळक का होईना, पण काही कुटुंबात मुलीचा जन्म वाजत-गाजत साजरा केला जातो. मुलींना सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध होतील, याची दक्षता पालक घेतात. काळ बदलत आहे. मुलींच्या स्वप्नांना पंख फुटत आहेत. त्यांचे स्वभान वाढत आहे. त्या भरारी घेऊ शकतील, अशी अनेक क्षेत्रे मुलींना खुणावतात. त्यातून अनेक मुली वेगळी वाट चोखाळतात. त्याचा स्वीकार समाज करू लागला आहे याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
देशाच्या महिला हॉकी संघातील बहुसंख्य जणी आजही दुर्गम गावात राहतात. त्या गरीब कुटुंबात जन्माला आल्या आहेत. त्यांच्या गावी वाहनही जाऊ शकत नाही. तरीही या मुलींच्या लहानपणापासून त्यांचे पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांना खेळण्यास संधी दिली. त्यांच्यावर पारंपरिक बंधने लादली नाहीत. आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची नकारघंटा वाजवली नाही. परिणामी वंदना कटारिया, राणी रामपाल, सलिमा टेटे यांच्यासह अनेक जणी आज मैदान गाजवत आहेत. महिलांच्या खो-खो संघाने नुकताच विश्वचषक पटकावला. या संघातील अनेक खेळाडूंची तीच कहाणी आहे.
शेती करणार्या युवा महिला शेतकर्यांची संख्या वाढत आहे. मुली दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. ‘वंशाला पणतीदेखील हवी’ अशी भावना त्यांचे पालक व्यक्त करतात. समाजाची मानसिकता बदलत असल्याची ही चिन्हे मानता येतील. आव्हाने खूप आहेत. बहुसंख्यांची मानसिकता अजूनही पारंपरिकच दिसते. मुलाच्या जन्माचा हट्ट धरणार्यांची समाजात कमतरता नाही. तथापि खो-खो संघातील मुलींच्या पालकांनी समस्यांचा पाढा न वाचता मुलींना त्यातून मार्ग शोधला. त्यांच्या प्रगतीसाठी आकाश मोकळे करून दिले. समाजासमोर आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला.
मुलींसाठी केंद्र-राज्य सरकारांच्या विविध योजना आहेत. ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ योजनेचे यंदा दहावे वर्ष आहे. सुकन्या समृद्धी, पोषण अभियान, पौगंडावस्थेतील मुलींसाठी उपक्रम, उडान या त्यापैकीच काही योजना! अशा योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम सामाजिक संस्था करू शकतील. तसे घडल्यास मुलींच्या सक्षमीकरणाला ते पोषक ठरू शकेल. कवी विंदा करंदीकर एका कवितेत म्हणतात…
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर…
या काव्यपंक्तींतील मर्म जाणून त्याचे आचरण करणार्या सर्वांचे अनुकरण समाज करेल, अशी अपेक्षा करता येईल.