रस्त्यांवरील खड्डे हे जनतेसाठी गँगरीन झाले आहे. गँगरीन ही लवकर बरी न होणारी जखम मानली जाते. रस्त्यांवरील खड्डे तरी दुसरे काय करतात? लोकांना हाडाची दुखणी देतात. त्यांची वाहने भंगारात काढतात. जीवघेण्या अपघातांचे कारण ठरतात. तथापि निदान सार्वजनिक गणेशोत्सवात तरी मुंबईतील लोकांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक आयुक्तांनी काढलेल्या एका आदेशामुळे निर्माण झाली आहे.
आदेश मुंबईपुरता असला तरी खड्ड्यांमुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. त्यामुळे मुंबईकरांची का होईना खड्ड्यांमधून सुटका झाली तर राज्यातील जनतेला बरेच वाटू शकेल. कारण हे दुखणे सर्वांचे सारखेच आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत असे त्या आदेशात म्हंटल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. ज्या तंत्रज्ञानाने खड्डे बुजवले जाणार आहेत त्यामुळे पुन्हा खड्डे पडणार नाहीत असे सांगितले जाते. पण खड्डे बुजवण्यापेक्षा खड्डेमुक्त रस्ते का बांधले जात नाहीत या प्रश्नाने लोक मात्र हैराण आहेत.
परदेशातील रस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी अधूनमधून शिष्टमंडळे जातात. ते नेमका कशाचा अभ्यास करतात हाही प्रश्न लोकांना सतावतो. देशातील शहरांचा कायापालट करण्याचे आश्वासन देण्यात सर्वपक्षीय पुढारी आघाडीवर असतात. पण त्यांनी निदान रस्ते तरी धड द्यावेत इतकीच जनतेची माफक अपेक्षा असते. पण तसे अभावानेच घडते. जिथे राष्ट्रीय महामार्ग देखील खड्ड्यात जातात तिथे गल्लीबोळातील रस्त्यांची काय कथा? रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम वर्षानुवर्षे सुरूच असते. दर पावसाळ्यात रस्ते खड्ड्यांत जातच असतात.
लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला की तात्पुरते बुजवलेही जातात. मुंबईतदेखील तसेच घडू शकेल का? पावसाळा सुरु आहे. पाऊस अधूनमधून तडाखे देत आहे. रस्त्यांना पाण्याचे वावडे असते. नेमके त्याच काळात कमी दिवसात खड्डे बुजवण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. यानिमित्ताने रस्ते अल्पावधीसाठी का होईना दुरुस्त होतील. लोकांची तात्पुरती का होईना खड्ड्यांतून सुटका होई शकेल. गणेशमंडळांचे देखावे ताठ मानेने आणि ताठ कण्याने पाहाता येऊ शकतील म्हणून लोक खुश होतील. तथापि अती घाई संकटात नेई हे इथेही लागू पडते.
खड्डे घाईत बुजवले जातील. काही दिवसांनी पुन्हा खड्डे पडतील आणि ते पुनःपुन्हा बुजवावेच लागतील म्हणून अनेक जण खुश होतील. असा हा सगळा खुशीचा मामला असावा का? अनेक खासगी कंपन्या रस्ते बांधतात. ते दर्जेदार असतात असा लोकांचा अनुभव आहे. मग प्रशासकीय यंत्रणेने बांधलेले रस्तेच खड्ड्यांत कसे जातात? या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. जे लोकांना उलगडून सांगण्याची गरज नाही. लोकही ते ओळखून आहेत. तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश हे त्याचे चपखल उदाहरण आहे.